पुणे : पर्यावरणाच्या दृष्टीने गणेशमूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी आता महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येणार आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आयोजिलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवात कोणत्याही कारणाने गणेशभक्तांची अडचण होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना महापौरांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप तसेच आरोग्य, बांधकाम, विद्युत, आकाशचिन्ह व अन्य विभागांचे प्रमुख तसेच चारही विभागांचे सहायक आयुक्त या बैठकीला उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या आधी सर्व भागातील रस्त्यांची दुरुस्ती, सार्वजनिक स्वच्छतागृहे मोफत उपलब्ध करणे, रस्त्यांची, स्वच्छतागृहांची साफसफाई, विशेषत: साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वत्र औषध फवारणी करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. उत्सवकाळात शहरात कुठेही अंधार राहणार नाही, सर्व पथदिवे सुरू असतील, याची काळजी घेण्यास त्यांनी पथ, तसेच विद्युत विभाग यांना सांगितले. आरोग्य विभागाने डॉक्टर्ससह वैद्यकीय पथके, प्राथमिक उपचाराची साधने तसेच वाहनही उपलब्ध करून ठेवण्याबाबत त्यांनी सांगितले.>नदीमध्ये मूर्ती विसर्जन केले तर नदीची हानी होत असल्याने मागील काही वर्षांपासून घरगुती गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करावे, अशी चळवळ सुरू आहे. तसेच नदीजवळही पालिकेच्या वतीने त्यासाठी खास हौद तयार करून देण्यात येतात. या वेळी घरगुती विसर्जन वाढावे, यासाठी असे विसर्जन करू इच्छिणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या वतीने एका बॅगमध्ये अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही पावडर बादलीभर पाण्यात टाकल्यानंतर प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्तीसुद्धा ४८ तासांमध्ये पूर्ण विरघळून जाणार आहे. पालिकेने यासाठी १० टन अमोनियम बायकार्बोनेटचा साठा करून ठेवला आहे.
घरीच मूर्ती विसर्जनावर भर
By admin | Published: August 24, 2016 1:14 AM