मुंबई : आदिवासी समाजातील लोकांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी राबविण्यात येणा-या ‘शबरी घरकूल’ योजनेतील १० हजार घरे तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या योजनेत २५ हजार घरे बांधली जाणार आहेत. घरकूल योजनेतील निधीचा गैरवापर रोखण्यासाठी, थेट बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात रविवारी ‘सर्वांसाठी परवडणारी घरे’ या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरातून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. एकही आदिवासी बेघर राहणार नाही, यासाठी ‘शबरी घरकूल’ योजना राबविण्यात येत आहे. त्यातील १० हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. घरकूल निधीतील गैरव्यवहार थांबविण्यासाठी घरकुलाचे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल.म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाने धोरण तयार केले आहे. त्यानुसार, मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. संक्रमण शिबिरातील लोकांना प्राधान्याने घरे मिळावीत, यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. समूह विकासावर राज्य सरकारचा भर आहे. मुंबईसाठी कॉमन डीसीआर तयार केल्याने सारखेच चटईक्षेत्र मिळणार आहे.
घरकूल निधीचे अनुदान आता थेट बँक खात्यात;आदिवासींसाठी १० हजार घरे तयार: देवेंद्र फडणवीस लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 4:19 AM