मुंबई: राज्यात कोरोना संकट काळात स्थलांतरित मजुरांना स्वगृही परतण्यासाठी काम करत असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली. काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर भाजपा आमदार राम कदम यांच्यावर मनसेनंदेखील राऊत यांच्यावर टीका केली. राऊत यांच्या मतांचं शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमधील कोणीही समर्थन केलेलं नाही. त्यामुळे ते एकाकी पडल्याचं चित्र आहे. संजय राऊत यांना आजच्या सामनसाठी लिहिलेल्या लेखात सोनू सूद करत असलेल्या मदतीबद्दल शंका उपस्थित केली. त्यांच्या मतांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केलं. 'अभिनेता सोनू सूद अनेक मजुरांना त्यांच्या घरी सोडून चांगलं काम करत आहे. संजय राऊत साहेब काय म्हणाले ते मी ऐकलेलं नाही. सोनू असो वा इतर कोणी असो, चांगलं काम करणाऱ्याचं आम्ही कौतुकच करू,' असं देशमुख म्हणाले. सकाळपासून भाजपा, मनसेचे नेते राऊत यांच्यावर टीकेचे बाण सोडत असताना कोणीही राऊत यांचा बचाव केलेला नाही.
संजय राऊत यांनी मांडलेले मुद्दे-‘लॉक डाऊन’ काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाब्बासकी दिली. महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची फार मोठी परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले ते बाबा आमटे. या नावांत आता आणखी एका महान सामाजिक कार्यकर्त्याचे नाव जोडावे लागेल ते म्हणजे सोनू सूद! अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून टोला हाणला आहे.‘लॉक डाऊन’च्या काळात सोनू सूदने जे केले ते बहुधा केंद्र, राज्य सरकारलाही जमले नाही. मागचे पंधरा दिवस तो घाम गाळत, उन्हातान्हात रस्त्यावर वावरताना दिसला. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, दिल्ली येथे जाऊ पाहणाऱ्या लाखो मजुरांसाठी सोनू सूद म्हणजे देवदूताप्रमाणे अवतरला. त्याने हजारो मजुरांना अलगद आपल्या घरी सुरक्षित पोहोचवले. गावी निघालेल्या मजुरांना कृतार्थ भावाने निरोप देताना सोनूची छायाचित्रे व व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहोचवण्यात अपयशी ठरले, पण सोनू सूदसारखे नवे महात्मा किती सहजतेने मजुरांना मदत करीत आहेत, असा प्रचार समाजमाध्यमांतून सुरू झाला. सोनू सूदने केलेल्या या कार्याची दखल महाराष्ट्राच्या राज्यपालांना घ्यावी लागली व सोनूला चहापानासाठी राजभवनाचे निमंत्रण आले. हे सोनू प्रकरण नक्की काय आहे? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.