मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत वा बाहेरही बोलताना अँटिलिया प्रकरणी योग्य ती माहिती दिली. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा सीडीआर (कॉल रेकॉर्ड्स) असेल तर तो त्यांनी एटीएसकडे द्यावा, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. (Home Minister Deshmukh has not done anything wrong saied Jayant Patil)पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील,मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याशी शरद पवार यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी स्पष्ट केले की, अँटिलिया, सचिन वाझे प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सचिन वाझेंसंदर्भात कारवाई करण्यास विलंब झाल्याच्या आरोपाचाही पाटील यांनी यावेळी इन्कार केला. काही अधिकाऱ्यांचा घटनेत सहभाग असेल तर त्यांची हयगय केली जाणार नाही. या प्रकरणात दाेषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात तपास यंत्रणा योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याच्याशी मंत्र्यांचा काहीही संबंध नाही. तपास यंत्रणेशी निगडित बाबींवर मंत्र्यांनी बाेलणे याेग्य हाेणार नाही. तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तपास करणाऱ्या त्या यंत्रणेने बोलणे अपेक्षित आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री देशमुख यांनी चुकीचे काहीही केलेले नाही - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 3:37 AM