मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. हरियाणासह अनेक राज्यांनी या चित्रपटावरील टॅक्स माफ केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजपने विधानसभेत केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना दिलीप-वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी चिंता व्यक्त करत द काश्मीर फाइल्स या चित्रपटामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला आहे.
भाजप नेते आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत तर नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द काश्मीर फाइल्स हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यावर बोलताना दिलीप-वळसे पाटील यांनी या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता व्यक्त केली आहे.
विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराशी संबधित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला करमाफी देण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली होती. मात्र, हा चित्रपटाचा खेळ संपला की, चित्रपटगृहाच्या बाहेर लोकांना एकत्र करुन हिंदू जनजागृती विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता झुंड चित्रपटाचे मोफत खेळ दाखविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.