मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. यातच नाना पटोले हे सातत्याने नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुंबई भाजपाध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्राद्वारे केली होती. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाई होईल असे म्हटले आहे.
'चौकशी होईल आणि...'मंगलप्रभात लोढा यांनी ट्विटरवर गृहमंत्र्यांकडून मिळालेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी योग्य तपास करुन, कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, भाजपने पत्र लिहून केलेल्या तक्रारीवर प्रसारमाध्यमांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनीही म्हटले की, भाजपच्या पत्रावर उचित कारवाई करावी हा माझा रिमार्क आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याची चौकशी होईल आणि जर तथ्य असेल तर कारवाई होईल.
नाना पटोलेंविरोधात भाजपचे आंदोलननरेंद्र मोदींबद्दल नाना पटोले अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नसून, कारवाई करावी यासाठी मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले होते.