मुंबई : राज्यात २०१६-१७ या काळात माझे फोन टॅप झाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पीए, तत्कालीन खासदार संजय काकडे यांचेही फोन टॅप झाले असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी विधानसभेत केला. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ सदस्यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. त्यावर, सदर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करताना पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांमार्फत फोन टॅपिंग केले गेले असा आरोप केला.फोन नंबर माझा होता पण नाव एका अमजद खान या व्यक्तीचे दिले गेले आणि ही व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी करते असे सांगून टॅपिंगची परवानगी घेण्यात आली होती. मी अमली पदार्थांची तस्करी करतो असा अहवाल दिला गेल्याचे पटोले म्हणाले. या टॅपिंगची परवानगी कोणी दिली होती असा सवाल त्यांनी केला. त्यावर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक यांच्या पातळीवर ती दिली जाते, मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय जात नाही असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. इतके वरिष्ठ अधिकारी या विषयाशी संबंधित असल्याने मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय एजन्सींकडून चौकशी करा : पाटीलकाही केंद्रीय एजन्सींकडून राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणी केंद्राकडून राज्याने माहिती घ्यावी अशी मागणी केली. त्यावर, केंद्राकडून तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.