मुंबई : बलात्काराच्या घटना रोखण्याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान परिषदेत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून ‘ब्रेकिंग न्यूज’ झाल्याने एकच गहजब झाला. बलात्काराच्या बहुतांश घटनांमध्ये कुटुंबीय व परिचित आरोपी असल्याचे आढळून आले आहे. अशावेळी प्रत्येक घरात पोलीस देणेही शक्य नसल्याची हतबलता आणि खंत गृहमंत्र्यांनी विधिमंडळात व्यक्त केली होती. प्रत्यक्षात मात्र घरोघरी पोलीस ठेवले तरी बलात्कार रोखणे शक्य नाही, असे वाक्य गृहमंत्र्यांच्या तोंडी घालून वृत्तवाहिन्यांनी दिवसभर टीकेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले.लग्नाचे आमिष दाखवून होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण ४२ टक्के आहे, तर शेजाऱ्यांकडून २१, मित्रांकडून १८, जमीनदारांकडून १.५, परिचितांकडून ६.४०, पैशांच्या आमिषाने ३, नातेवाइकांडून ६.६५, तर वडील आणि भावांकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण ६.३४ टक्के असल्याचे गृहमंत्र्यांनी या वेळी सांगितले. बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याबाबत समाजाची मानसिकता बदलायला हवी, असे मत मांडताना पाटील यांनी ही आकडेवारी दिली होती. मात्र याचा विपर्यास होऊन ब्रेकिंग न्यूज बनली आणि त्याचा फटका पाटील यांना बसला. अखेर आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असा खुलासा पाटील यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केला.पाटील यांनी नेमके कुठले वक्तव्य केले आहे, अशी विचारणा विधानसभेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि मनसेचे प्रवीण दरेकर यांनी केली असता पाटील यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिले. ‘घराघरात पोलीस ठेवले तरी बलात्कार रोखता येणार नाही,’ असे वक्तव्य आपण केलेलेच नाही. प्रसारमाध्यमांनी त्याचा विपर्यास केला असून त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला. पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला का याची माहिती घेऊन पुढे काय करायचे याचा निर्णय गुरुवारी घेण्यात येईल, असे अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची विपर्यस्त ‘ब्रेकिंग न्यूज’!
By admin | Published: June 12, 2014 3:07 AM