- जमीर काझीमुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनाविना कार्यरत असलेल्या होमगार्डची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. एकट्या महानगर मुंबईत कार्यरत असलेल्या चार हजारांहून अधिक जवानांचे १५ कोटी ३० लाख २०,६३३ रुपयांचे मानधन थकले आहे. त्यासाठी आता वित्त विभागाकडून अतिरिक्त निधीची मंजुरी मिळविण्याची आवश्यकता आहे. या खात्याची जबाबदारी सांभाळत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार होमगार्डना केव्हा न्याय देतात, याकडे राज्यातील ४२ हजारांहून अधिक जवानांचे लक्ष लागून राहिले आहे.राज्यातील होमगार्डच्या जिल्हानिहाय थकीत मानधनाची यादी ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. त्यामध्ये मुंबईनंतर सर्वाधिक तीन हजारांहून अधिक जवान असलेल्या ठाणे जिल्ह्यात ९ कोटी ७५ लाख ८५००, तर पुण्यातील होमगार्डना ८ कोटी ५५ लाख ७१, २५० रुपये भागवावयाचे आहेत. २६ जिल्ह्यांतील सर्वात कमी थकीत मानधन हिंगोली जिल्ह्यातील असून त्यांना १ कोटी ४४ लाख ६५,३००, तर वाशिममधील होमगार्डना १ कोटी ४९ लाख ६३,६०५ भागवावयाचे आहेत.राज्यातील होमगार्डच्या मुख्य प्रशिक्षण केंद्रासह एकूण ३६ ठिकाणी जिल्हा केंद्र आहेत. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जवानांचे संबंधित स्तरावर मानधन काढले जाते. मात्र, गेल्या सप्टेंबरपासूनचे १३७ कोटी ८३ लाखांचे मानधन थकले असून, या आर्थिक वर्षअखेरपर्यंत आणखी १४० कोटी ५५ लाख रुपये म्हणजे एकूण २७८ कोटी ३८ लाखांची आवश्यकता लागणार आहे.गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांचे मानधन प्रतिदिवस ३०० रुपयांवरून थेट ६७० इतके वाढविण्यात आले. मात्र त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची तरतूद न केल्याने थकबाकीचे संकट निर्माण झाले आहे.
मुंबईतील होमगार्डची १५ कोटींची देणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 7:23 AM