विरार : वाशी येथून दहा वर्षांपूर्वी हरवलेल्या अनिताला पुन्हा एकदा आपले कुटुंब मिळवून देण्याचे काम विरार येथील संजीवन या संस्थेने केले. यावेळी अनिता आणि तिच्या घरच्यांचा आनंद ओसंडून वहात होता.वाशी येथे राहणारी अनिता ८ वर्षांची असताना लहान भावाशी भांडण झाल्याने घरातून निघून गेली होती. अतिशय लहान व आणि घरची नीट माहिती नसल्याने पोलिसांनी अनिताची रवानगी भिवंडी येथील बालसुधार गृहात केली होती. अनिता लहान असतानाच तिचे वडील वारले होते. अनिताची आई घरकाम करून चार मुलांचे पोट भरत आहे. अशा स्थितीतही आपल्या मुलीच्या शोधासाठी अनिता हरवल्यावर तिची आई सात वर्षे वाशी पोलीस स्थानकात फेऱ्या मारत होती. तसेच तिने वाशी परिसरातही फेऱ्या मारल्या होत्या. पण तिच्या हाती केवळ निराशा आली होती.भिवंडी येथील बालगृहात काही वर्षे झाल्यानंतर अनिताला विरार येथील संजीवनी या सामाजिक संस्थेत पाठवण्यात आले होते. येथे अनिताचे संगोपन होऊ लागले. येथे असतानाच अनिताला स्वत:च घरी जायची संधी मिळाली. अनिता १८ वर्षाची झाल्यानंतर तिला कायदेशीर आश्रमात ठेवता येत नसल्याने तिच्या घरच्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. अनिताला आपले घर वाशीला असल्याचे अंधुकसे आठवत होते. अनिताचे नशीब बलत्तर होते. ज्या ठिकाणी तिने तिचे घर आहे सांगितले होते. त्या ठिकाणी तिच्या नातेवाईकाच्या ओळखीच्या एका इसमाने अनिताच्या घरचा पत्ता दिला. आणि तब्बल १० वर्षांनी अनिताला आपले घर मिळाले. अनिताच्या घरी तिची आई , दोन भाऊ आणि एक बहिण आहे. अनिताला पाहून तिच्या आई आणि भावंडाना खूप आनंद झाला आहे. (वार्ताहर)
हरवलेल्या अनिताची १० वर्षांनी घरवापसी
By admin | Published: October 13, 2016 5:33 AM