न्यायालयात अर्ज : दोघांच्या उपस्थितीत सुनावणीची विनंतीनागपूर : गायक हनीसिंग व बादशाह यांनी अश्लील गाण्यांसंदर्भातील प्रकरणाच्या चौकशीला योग्य सहकार्य केले नाही अशी कैफियत पाचपावली पोलिसांनी मांडली आहे. याविषयी पोलिसांनी गुरुवारी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून दोघांच्या उपस्थितीतच त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. याप्रकरणावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्यासमक्ष सुनावणी केली जात आहे. न्यायालयाने पोलिसांच्या अर्जाचे अवलोकन केल्यानंतर उद्याची (शुक्रवारी) तारीख दिली आहे. दोन्ही गायकांनी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून बयान नोंदविले आहे. हनीसिंग न्यायालयाच्या आदेशानंतर उपस्थित झाला होता तर, बादशाह त्याच्या आधीच येऊन गेला होता. तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी हनीसिंगला अटकपूर्व जामीन देऊ नये यासाठी अर्ज दाखल केला आहे. जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत असल्याचे जब्बल यांचे म्हणणे आहे. हनीसिंगतर्फे अॅड. अतुल पांडे, बादशाहतर्फे अॅड. रजनीश व्यास, तक्रारकर्त्यातर्फे अॅड. रसपालसिंग रेणू व अॅड. पवन डेंगे, तर शासनातर्फे सरकारी वकील विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
हनीसिंग व बादशाहचे पोलिसांना असहकार्य
By admin | Published: January 16, 2015 1:03 AM