न्यायालयाच्या आदेशाचे करावे लागले पालन नागपूर : आपल्या गाण्याने देशभरातील तरुणांना नादी लावणाऱ्या पॉपस्टार यो यो हनीसिंग हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या आदेशावरून आज उत्तर नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्यात हजर झाला. आदेशानुसार हनीसिंगला १३ जानेवारी रोजी हजर व्हायचे होते. तत्पूर्वीच तो हजर झाला. हनीसिंगने अटकपूर्व जामिनासाठी तर या प्रकरणातील तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी हनीसिंगला अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दोन्ही अर्जांवर गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने हनीसिंगला पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले. हनीसिंगला दोन आठवड्यांपूर्वीच सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन प्राप्त झाला होता. त्याने देश सोडून जाऊ नये, प्रकरणाशी संबंधित लोकांवर प्रभाव निर्माण करू नये, तपास अधिकाऱ्यासमक्ष हजर राहून तपासकामी सहकार्य करावे, अशा अटी व शर्ती जामीन आदेशात होत्या. जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला होता. हनीसिंगच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत असल्याचे जब्बल यांचे म्हणणे आहे. प्रथम खबरी अहवाल दाखल केल्यापासून पाचपावली पोलिस हनीसिंगला अटक करण्याच्या प्रयत्नात होते. (प्रतिनिधी)तासभर ठाण्यातहनीसिंग हा दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावरून एमएच-३१-डीके-७०११ क्रमांकाच्या स्कोडा लॉरा या काळ्या रंगाच्या आलिशान कारने थेट पाचपावली पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याचे वडील आणि वकील त्याच्यासोबत होते. त्याचे येणे गुप्त होते. त्यामुळे अचानक त्याला पाहून अख्खे पोलीस ठाणे अचंबित झाले. ही वार्ता परिसरात पसरली आणि बघ्यांनी ठाण्याच्या सभोवताल प्रचंड गर्दी केली. हनीसिंग हा तासभर पोलीस ठाण्यात होता. संबंधित प्रकरणाच्या संदर्भात त्याचे बयाण पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.डी. निकम यांनी नोंदवून घेतले.
हनीसिंग अखेर पोलीस ठाण्यात हजर
By admin | Published: January 11, 2015 12:53 AM