हायकोर्टात माहिती : जेएमएफसी न्यायालयाचा आदेशनागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी जी. आर. पाटील यांनी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगच्या अश्लील गाण्यांच्या संगणकीय लिंक ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली.पाचपावली पोलिसांनी नवी दिल्ली येथील इलेक्ट्रॉनिक अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या सायबर लॉ शाखेला जेएमएफसी न्यायालयाच्या आदेशाची प्रत पाठविली आहे. तसेच, सोबतच्या पत्रात हनीसिंगच्या अश्लील गाण्यांच्या पाच संगणकीय लिंक नमूद करून त्या ब्लॉक करण्याची सूचना केली आहे. २४ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक हनीसिंगला शोधण्यासाठी मुंबईला गेले होते. पथकाने बांद्रा पोलीस, हनीसिंगचे विधी सल्लागार अॅड. रिजवान सिद्धिकी व हनीसिंगचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतरही त्यांना हनीसिंगचा पत्ता मिळाला नाही. ही बाब लक्षात घेता न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याप्रकरणावर उद्या, शुक्रवारी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. यापूर्वी पोलीस पथक दिल्लीत जाऊन रिकाम्या हाताने परत आले होते. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)काय आहे प्रकरणअश्लील गाणी गाणे, अश्लील गाण्यांच्या चित्रफिती व ध्वनीफिती काढणे या आरोपांखाली हनीसिंग व संबंधितांवर कडक कारवाई करण्यासाठी आनंदपालसिंग जब्बल यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. यावरून गेल्या २६ एप्रिल रोजी पाचपावली पोलिसांनी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. हनीसिंगच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत आहे. समाजात असंस्कृत वातावरण निर्माण होत आहे. त्याला अश्लील गाणी गाण्यापासून थांबविण्यात यावे, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.
हनीसिंगची अश्लील गाणी ब्लॉक
By admin | Published: December 19, 2014 12:46 AM