सध्या भारतात कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस विकसित करण्यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. अशातच सायरस पुनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ही संस्थादेखील कोरोनावरील लस विकसित करण्याचं काम करत आहे. याव्यतिरिक्त आजवर सीरम इन्स्टिट्यूटनं अनेक रोगांवरील लसीही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या अनेक वर्षांचं योगदान पाहता सायरस पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती केली आहे. "सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महासाथीतही पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे," असं नांदगावकर म्हणाले. असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी विनंतीही त्यांनी केली आहे.