लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी (जि. गडचिरोली) : भामरागड तालुक्यातील कारसपल्ली गावाजवळ ३ मे रोजी झालेल्या भूसुरुंग स्फोटात एक पोलीस जवान शहीद झाला, तर १९ जवान जखमी झाले होते. जखमींवर उपचार करण्यासाठी सरकारी वैद्यकीय यंत्रणा अपुरी असताना आलापल्ली येथील डॉ.चरणजितसिंह सलुजा यांनी सर्व जखमी जवानांवर प्राथमिक उपचार करून त्यांना जीवदान दिले. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीबद्दल मुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्यांचा सत्कार केला. कारसपल्ली भूसुरुंग स्फोटात जखमी झालेल्या सर्वच पोलीस जवानांना सर्वप्रथम भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने जवानांवर उपचार करण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. भामरागड ते आलापल्लीदरम्यान घनदाट जंगल असल्याने जवानांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयातही हलविणे धोक्याचे होते. त्यामुळे आलापल्ली येथील डॉ. चरणजितसिंह सलुजा यांना बोलाविण्यात आले. ६३ किमीचे अंतर रात्री पार करून डॉ. सलुजा भामरागड ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. रात्रभर सर्वच जखमी जवानांवर उपचार केले. दुसऱ्या दिवशी सकाळी जखमी जवानांना भामरागड येथून हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यापर्यंत डॉ. सलुजा जखमी जवानांसोबत होते. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात तर पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी आपल्या दौऱ्यात देसाईगंज येथे त्यांचा सत्कार केला.
जवानांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरचा गौरव
By admin | Published: May 15, 2017 6:30 AM