मुंबई : पोलीस दलात उल्लेखनीय सेवेबद्दल तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या १०० आजी-माजी पोलीस अधिकारी-अंमलदारांना, ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ व ‘पोलीस शौर्य पदक’ या पदकांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते मंगळवारी वितरण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या सोहळ्यात १ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, १२ पोलीस शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेबद्दल ७ राष्ट्रपती आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ८० पोलीस पदके प्रदान करण्यात आली.२०१५ मध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्टÑ सुरक्षा मंडळांचे कार्यकारी संचालक संजय बर्वे, निवृत्त महासंचालक के. एल. बिष्णोई, एसीबीचे अपर महासंचालक विवेक फणसाळकर, पुणे ग्रामीणचे अधीक्षक सुवेझ हक आदींचा समावेश होता.गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आदींसह पुरस्कार प्राप्त पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या हवालदार गणपत मडावी यांचे मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक त्यांच्या पत्नी मीना मडावी यांच्याकडे सुुपुर्द करण्यात आले. शहीद सुनील मडावी (मरणोत्तर) यांच्या आई अनुसया मडावी यांच्याकडे, तसेच शहीद पोलीस नाईक गिरीधर नागो आत्राम (मरणोत्तर) यांच्या पत्नी छबीताई आत्राम यांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले. तत्कालीन गडचिरोलीचे अधीक्षक मोहम्मद सुवेज हक यांनाही या पदकाने सन्मानित करण्यात आले.
कर्तृत्ववान पोलिसांचा राज्यपालांकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 4:02 AM