मुंबई : निर्भयाचे गुन्हेगारांना शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजता फासावर लटकवण्यात आले. त्यामुळे कायद्याचा सन्मान राखला गेला अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केल्या. सात वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर अखेर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे. निर्भयाच्या परिवाराला कठोर संघर्षातून जावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. निर्भयासारख्या भयंकर घटना आपल्या देशातच नव्हे तर जगातही होता कामा नये,असेही त्या म्हणाल्या. निर्भया प्रकरणातील चारही दोषी आरोपींना शुक्रवारी पहाटे (दि. २०)फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या आई वडिलांसह अनेकांनी सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील एक व्हिडिओ व ट्विटरच्या माध्यमातून निर्भयाला श्रध्दांजली वाहिली. त्या व्हिडिओत सुळे म्हणाल्या, निर्भयाच्या आई ज्या प्रसंगातून, दु:खातून गेली असेल त्याबद्दल मी नि:शब्द आहे. पण आता पुन्हा दुसरी निर्भया होऊ नये याची खबरदारी आपण सर्वजण नक्की घेऊ शकतो. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,हा संदेश या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीतून दिला गेला.बलात्कार ही मोठी आणि भयानक गोष्ट असून छेडछाडमुक्त देश व जग असावे. मुलगी असो वा मुलगा त्याला किंवा तिला कोणत्याही वेळी कुठेही जाण्याची मोकळीक मिळालीच पाहिजे असे त्यांनी नमूद केल्या. त्या म्हणाल्या, की सत्तेत कुणीही असो नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचा न्याय ही सरकारची जबाबदारी आहे.निर्भया प्रकरण असो की हिंगणघाटची घटना किंवा महाराष्ट्रात गेल्या चार पाच वर्षांत घडलेल्या वेगवेगळ्या घटना असतील त्या अतिशय दुर्देवी आहेत. अशा घटनांचा निवाडा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट असावेत व आम्ही त्याबाबत प्रयत्नशील आहोत.
दिशा कायद्यासाठी प्रयत्नशीलमहाराष्ट्रात दिशा कायदा राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'दिशा' कायद्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते आंध्र व तेलंगणास जाऊन त्याबाबतची सखोल माहिती घेऊन आले आहेत.
निर्भयाच्या आई ज्या प्रसंगातून, दु:खातून गेली असेल त्याबद्दल मी नि:शब्द आहे. पण आता पुन्हा दुसरी निर्भया होऊ नये याची खबरदारी आपण सर्वजण नक्की घेऊ शकतो.