पुणे : पुण्यात पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करणाऱ्या श्री भाऊ रंगारी मंडळाने गणेशोत्सवाच्या वैभवशाली परंपरेत आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रथमच महिलेच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करून महिला शक्तीचा सन्मान केला आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांना हा मान देण्यात आला. त्यांच्यासोबत आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मिरवणुकीच्या रथाचे सारथ्यही केले. समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याच्या भूमिकेतून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याला पुण्यासह संपूर्ण राज्यातून प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीला आदिशक्ती म्हटले जात असले, तरी पुरुषप्रधान संस्कृतीने गणेशोत्सवासारख्या उपक्रमांवर आपले वर्चस्व ठेवले होते. ‘लोकमत’ने पुरोगामीत्वाच्या भूमिकेतून गेल्या वर्षीपासूनच महिलांनाही गणेशोत्सवात सामावून घेण्यासाठी ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करणे सुरू केले. याबाबत विचारांचा जागर करून इतर मंडळांनीही त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते. पुण्याच्या गणेशोत्सवातील एक वैभवशाली परंपरा असणाऱ्या श्री भाऊ रंगारी गणपती मंडळाने महिलेच्य हस्ते प्राणप्रतिष्ठापना करून या विचाराला आणखी पुढे नेण्यात हातभार लावला आहे. श्री भाऊ रंगारी मंडळाच्या श्री ची प्राणप्रतिष्ठापना स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या हस्ते आज दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली़ भाऊ रंगारी भवनापासून मंडळाच्या शोभा यात्रेस सकाळी ९़३० वाजता सुरुवात झाली़ रथाचे सारथ्य आमदार नीलम गोऱ्हे व स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी केले़ याबाबत नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ही एक एैतिहासिक घटना आहे़ श्री च्या रथाचे सारथ्य करायला मिळाले ही समाज मनाने केलेला सन्मान आहे़ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे सन्मान हा मागायचा नसतो़ त्याचीच प्रचिती आज आली़ मी आणि अश्विनी कदम आम्ही दोघीही राजकारणाची पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलो आहोत़ अशावेळी आमच्यावर विश्वास दाखवून एकप्रकारे सर्व स्त्रीशक्तीचा सन्मान झाला आहे़ मिरवणुकीत ज्या प्रकारे भाविकांचा प्रतिसाद मिळाला, त्यावरुन समाजाच्या मनात दुजाभाव नाही़ सर्व एकच आहोत, याची जाणीव झाली़ घराघरात गृहिणी पुजा करतात़ श्रीच्या रथाचे सारथ्य करणे याला वेगळे औचित्य आहे़ शहरमध्ये १२४ वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या भाऊ रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना एका महिलेच्या हस्ते करण्यात आली, यामुळे स्त्री शक्तीचा सन्मान झाला आहे. मिरवणुकीमध्ये त्यांच्या रथाचे सारथ्य करण्याचा ऐतिहासिक क्षण मला अनुभवता आला. भाऊ रंगारी मंडळाने पर्यावरण पूरक गणपती हा संदेश अनेक वर्षापूर्वीच दिलेला आहे. त्यांच्या वास्तूचा समावेश हेरिटेज वास्तूमध्ये होऊन ते पर्यटनाचे केंद्र बनावे याकरिता महापालिकेच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे.’’- अश्विनी कदम, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका