मुंबई : राज्यातील हजारो अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी २२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ९५० रुपयांची वाढ होऊन ते आता मासिक ५ हजार रुपये करण्यात आले आहे. त्याचा फायदा ९५ हजार ३४१ अंगणवाडी सेविकांना होईल. मदतनिसांना ५०० रुपये वाढीसह २ हजार ५०० रुपये मानधन मिळेल. त्याचा फायदा ९२ हजार २३ मदतनिसांना होईल. मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ होऊन ते आता ३ हजार २५० रुपये करण्यात आले आहे. त्याचा फायदा ९ हजार ८९८ मिनी अंगणवाडी सेविकांना होईल. (विशेष प्रतिनिधी)मेपासून मानधनच नाहीअंगणवाडी सेविका, मदतनिसांना मेपासून मानधनच मिळालेले नाही. ते कधी देणार असा त्याचा सवाल आहे. मुनगंटीवार यांनी याबाबत सांगितले की, हे मानधन दर महिन्याच्या एक तारखेला देण्यासाठीची पद्धत तयार केली जात आहे. प्रलंबित मानधनही दिले जाईल. आघाडी सरकारच्या काळात ही वाढ करण्यात आली होती. नंतर ती रोखण्यात आली. आता एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीतील वाढीव मानधनाचा फरक देखील दिला जाईल, असे महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढले
By admin | Published: July 29, 2015 12:59 AM