लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
कल्याण डोंबिवलीतच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कोरोना काळात डोंबिवलीमधील ऑक्सिजन मॅन देवदूताप्रमाणे धावून आला. अर्थात संकट काळात पुढे येऊन मदत करण्यात कल्याण डोंबिवलीकर अग्रेसर आहेत हे अनेकदा दिसून आले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत डोंबिवलीकर भाऊसाहेब चौधरी यांनी जिल्ह्यातील विविध पालिकांना ऑक्सिजन पुरवला. अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या चौधरी यांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते " कोविड योद्धा" म्हणून सत्कार करण्यात आला आहे.
डोंबिवली आणि अंबरनाथ येथे चौधरी यांच्या मालकीची मॉर्डन गॅस कंपनी आहे. पूर्वी हॉस्पिटल आणि औद्योगिक अशा दोन्ही ठिकाणी ते ऑक्सिजन पुरवठा करायचे. मात्र कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रासाठी संपूर्ण ऑक्सिजनचा पुरवठा त्यांनी सुरू केला. कोविड काळात अनेक गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मोफत देऊन चौधरी यांनी लॉकडाऊन मध्ये मोफत धान्य वाटप, मदत सुद्धा केली आहे. विविध महापालिकांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी ते रात्रंदिवस त्यावेळी झटले.भाऊसाहेब चौधरी हे डोंबिवलीचे रहिवासी असून शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कोविड 19 च्या वैश्विक महामारीच्या बिकट परिस्थितीत “मानव सेवा हिच ईश्वरसेवा" हे जाणून महापालिकेच्या डोंबिवली जिमखाना कोविड हॉस्पीटल मध्ये चौधरी हे अविरत सेवा देत आहेत. महापालिकेला कोविड 19 राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार मिळवून देण्यात चौधरी यांचेही योगदान आहे. - डॉ विजय सूर्यवंशी, आयुक्त, केडीएमसी.