मुंबई : राज्यातल्या प्रमुख शहरांचा किमान तापमानाचा पारा खाली घसरला असतानाच आता मुंबईचे किमान तापमानही खाली आले आहे. मुंबईचे किमान तापमान २४ ते २६ अंशाहून थेट २१ अंशावर घसरले आहे. सोमवारी तर मुंबईचे किमान तापमान १९.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. किमान तापमानातील घसरणीमुळे मुंबईच्या हवेत गारवा निर्माण झाला आहे. विशेषत: रविवारच्या रात्री आणि सोमवारी पहाटे मुंबईत सुटलेल्या गार वाºयाने मुंबईकरांना थंडीचा सुखद अनुभव दिला. किमान तापमानात आता उत्तरोत्तर आणखी घट होणार आहे. परिणामी, किमान तापमानात होणारी घट मुंबईकरांना हुडहुडी भरवणार आहे.आॅक्टोबर हिटचा तडाखा बसलेल्या मुंबईच्या कमाल तापमानाने थेट ३६ अंशावर मजल मारली होती. आर्द्रतेमध्येही वाढ झाल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. वातावरणात होत असलेले बदल आॅक्टोबर हिटमध्ये भरच घालत असल्याने मुंबई चांगलीच तापली होती. आता मात्र नोव्हेंबरच्या मध्यात तापमानाचा पारा घसरला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईचे किमान तापमान २८ अंशाच्या आसपास नोंदवत होते. कालांतराने यात काही अंशी घट झाली व किमान तापमान २६ अंशावर घसरले. दरम्यानच्या काळात राज्यात थंडीचा जोर वाढू लागला असतानाच मुंबईच्या किमान तापमानातही उल्लेखनीय घट झाली; आणि मुंबईचे किमान तापमान थेट २४ वरून २१ अंशावर येऊन ठेपले. आता तर किमान तापमान १९.३ अंश नोंदवले आहे. रविवारी रात्री सुटलेल्या गार वाºयामुळे मुंबईकरांना थंडीचा प्रत्यय आला. सोमवारी सकाळीही हवेत गारवा पडल्याने मुंबईमधील वातावरण आल्हाददायक झाले होते.
मुंबईकरांना हुडहुडी : राज्यातील तापमानातही घट ,मुंबई १९.३ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 3:13 AM