सोलापूर : पाऊस पडून गेला, जमीन ओली, ओल्या चटय्या, गार वारा, ओले कपडे ,कोणाकडे पांघरूण आहे, कोणाकडे नाही अशा परिस्थितीत आशा कर्मचाºयांनी झेडपीच्या गेटसमोर मुक्काम ठोकत आपले आंदोलन कायम ठेवले आहे.
लाल बावटा आशा वर्कर्स गटप्रर्वतक युनियनतर्फे आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांच्या मानधनात तिपटीने वाढ करण्याचा शासकीय आदेश त्वरीत काढा या मागणीसाठी मंगळवारपासून झेडपीच्या गेटसमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मानधन वाढीचा जोपर्यंत आदेश निघत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार या कर्मचाºयांनी केला आहे. शहर व जिल्ह्यातील आशा कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. मंगळवारी रात्री सर्व कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी झोपी गेले. सोबत आणलेल्या शॉल, चादरीचा आसरा घेत सर्वांनी रात्र उजाडली. बºयाच जणींकडे पांघरण्यास काहीही नव्हते. ज्यांच्याकडे होते तेही पावसाने ओलेचिंब झाले होते. अशाही स्थितीत या कर्मचाºयांनी आंदोलनातून माघार घेतली नाही.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत चालणाºया विविध कामांसाठी मदत करणाºया आशा स्वयंसेविकांना दरमहा अडीच हजार तर गटप्रवर्तकांना प्रवास भत्त्यासह ८७२५ इतके मानधन दिले जाते. या दोघींवर असलेली कामांची जबाबदारी पाहता त्यांना वेठबिगारीप्रमाणे मानधन दिले जात आहे. आशा स्वयंसेविकांना दहा हजार मानधन द्यावे, या मागणीबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर चर्चा झाली होती. दोघांनीही मानधनात तिप्पट वाढ करू, असे आश्वासन दिले होते. पण आता विधानसभा निवडणूक तोंडावर असून, केव्हाही आचारसंहिता लागू शकते. पण दोन्ही मंत्र्यांनी मानधन वाढीचा निर्णय जाहीर केलेला नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी एम. ए. पाटील, सलीम पटेल, शंकर पुजारी, भगवान देशमुख, घोडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.