पुणे : कोरोना विषाणूने अनेक देशांना विळखा घातला असल्याने जगभरातील पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. पुण्यातून चीन, अन्य आशियाई देश, युरोपसह अन्य देशांमध्ये सहलीसाठी जाणाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. त्यामुळे काहींनी नियोजित सहली रद्द केल्या असून अनेक जण ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भुमिकेत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे २० ते ५० टक्क्यांपर्यंची बुकिंग रद्द झाल्याचे टॅव्हल एजंट व कंपन्यांकडून सांगण्यात आले.चीनमधून सुरूवात झालेल्या कोरोना विषाणूने बाधित झालेले २९ रुग्ण देशात आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्याचा फटका पर्यटनालाही बसू लागला आहे.
मार्च, एप्रिल, मे या कालावधीत शाळा-महाविद्यालयांना सुट्टया असल्याने अनेक जण परदेशी सहलींचे नियोजन करतात. त्यासाठीचे बुकिंग डिसेंबर महिन्यापासूनच सुरू होते. त्यानुसार चीनसह, नेपाळ, भुतान, जपान, श्रीलंका तसेच अन्य आशियाई देश, युरोप, ऑस्ट्रेलिया आदी देशांना अधिक पसंती दिली जाते. पण यंदा कोरोनामुळे पर्यटकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून नियोजित सहली रद्द करण्याकडे कल वाढू लागला आहे.
...............
५० ते ६० टक्के बुकिंग केले रद्दहे प्रमाण जवळपास २० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. तर अनेक जण कोरोनाचा प्रसार एप्रिल-मेपर्यंत थांबेल, या आशेवर आहेत. आपल्याकडील सर्व बुकिंग रद्द झाल्याची माहिती एका ‘ट्रॅव्हल एंजट’ने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच इतरांकडील ५० ते ६० टक्के बुकिंग रद्द झाल्याचेही त्यांनी सांगितले.
..............................
‘कोरोनाच्या भीतीमुळे ७ ते ८ आंतरराष्ट्रीय सहली रद्द झाल्या आहेत. तसेच आणखी काही रद्द होऊ शकतात. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन नुकताच हा व्यवसाय सुरू केला होता. पण आता खूप नुकसान सहन करावे लागत आहे,’ असे कीन ट्रॅव्हल्सचे संचालक सी. के. गौरव यांनी सांगितले..........पर्यटकांमध्ये कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. भीतीपोटी नियोजित सहली रद्द केल्या जात आहेत. तर, एप्रिल व मे महिन्यांत सहली असलेले अनेक जण कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची वाट पाहत आहेत. आम्ही कोणत्याही पर्यटकांवर सहल रद्द न करण्याबाबत जबरदस्ती करत नाही; पण त्यांना थांबण्याचा सल्ला देत आहोत. सहल रद्द केल्यास पर्यटकांसह आमचेही आर्थिक नुकसान होत आहे. सहलींसाठी परदेशामध्ये हॉटेल किंवा इतर सुविधा आधीच बुक कराव्या लागतात. अचानक रद्द केल्यास त्याचा परतावा मिळण्यात अडचणी येत आहेत. पर्यटकांनी घाबरून न जाता थोडी प्रतीक्षा करावी.- नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे.........लोकांच्या मनामध्ये कोरोनाची भीती आहे. सध्या २० ते ३० टक्के नियोजित सहली रद्द झाल्या आहेत; पण प्रत्यक्षात अनेक देशांमधील पर्यटन सुरू आहे. आम्ही दोन दिवसांपूर्वीच न्यूझीलंडहून एका ग्रुपला घेऊन आलो. त्यांना कोणतीही अडचण आली नाही. - विवेक गोळे, संचालक, भाग्यश्री ट्रॅव्हल्स...........कोरोनामुळे लोक नियोजित सहलींविषयी सातत्याने विचारणा करीत आहेत. आम्ही त्यांना सध्यातरी थांबण्याचा सल्ला देत आहोत. उन्हाळ्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे नियोजित सहली रद्द न करण्याचे सांगत आहेत. सध्या जरी सहली रद्द होत नसल्या तरी लोक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. - विनायक वाकचौरे, बिझनेस मॅनेजर, गिरीकंद हॉलीडेज्..........