वसंत भोसले - कोल्हापूर
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीची अंतिम टप्प्यावरील चर्चा आजवर निवडून न आलेल्या जागांच्या अदलाबदलीवर येऊन ठेपली आहे. हा मुद्दा विचारात घेतला, तर दक्षिण महाराष्ट्रामधील 26 विधानसभा मतदारसंघांपैकी 14 मतदारसंघांच्या अदलाबदलाची चर्चा करावी लागणार आहे. जे मतदारसंघ शिवसेना किंवा भाजपाकडे असून केव्हाही जिंकलेले नाहीत. त्यामुळे या चर्चेच्या अडलेल्या घोडय़ाचा पाय दक्षिण महाराष्ट्रात अडकलेला आहे काय? अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात दहा, तर सांगली आणि सातारा जिल्ह्यांत प्रत्येकी आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी आठ शिवसेनेकडे, तर दोन भाजपाकडे आहेत. भाजपाने इचलकरंजीमध्ये गतनिवडणुकीतच विजय नोंदविला आहे. तर दक्षिण कोल्हापूर त्यांना जिंकता आलेला नाही. शिवसेनेकडे कोल्हापूर शहर, करवीर, कागल, चंदगड, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले आणि शाहूवाडी हे आठ मतदारसंघ आहेत. त्यापैकी चंदगड, राधानगरी आणि शिरोळमध्ये त्यांना केव्हाही यश मिळालेले नाही. महायुतीमध्ये सामील झालेल्या स्वाभिमानी संघटनेने हे तिन्ही मतदारसंघ आता मागितलेले आहेत. त्यामुळे
सेनेचे आता तीन मतदारसंघ कमी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार भाजपाकडे, तर चार शिवसेनेकडे आहेत. भाजपाने सांगली, मिरज आणि जतमध्ये गतनिवडणुकीत विजय नोंदविला. ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात भाजपाला केव्हाच विजय मिळविता आलेला नाही. युती झाल्यापासून गेल्या 25 वर्षात शिवसेनेला सांगली जिल्ह्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. तासगाव, खानापूर, पलूस-कडेगाव आणि शिराळा या मतदारसंघात भाजपाला तगडे उमेदवार मिळू शकतात, पण खानापूरचा अपवाद वगळता इतर मतदारसंघ शिवसेना सोडण्यास तयार नाही. तासगावमधून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपाकडून इच्छुक आहेत. त्यांनी नुकताच प्रवेशही केला आहे, पण ही जागा शिवसेनेकडे आहे. पलूस-कडेगावमध्ये वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या विरोधात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजपाकडून लढण्यास तयार आहेत, पण ही जागा देखील शिवसेनेकडे आहे. खानापूरमधून कॉँग्रेसचे आमदार सदाशिवराव पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर लढणार आहेत. त्यांनी नुकताच प्रवेशही केलेला आहे.
साता:यात आठपैकी चार जागा सेना व भाजपाकडे आहेत. त्यापैकी सातारा आणि माण या जागा पूर्वी भाजपाने एकवेळ जिंकलेल्या आहेत. दक्षिण आणि उत्तर क:हाड या जागा भाजपाला जिंकता आलेल्या नाहीत. शिवसेनेकडे कोरेगाव, वाई, फलटण आणि पाटण या जागा आहेत. त्यापैकी केवळ पाटणमधून शंभूराजे देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या विरोधात विजय मिळविला आहे. महायुतीत स्वाभिमानी संघटनेची भर पडली असून, त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील 7 जागांवर हक्क सांगितला आहे, त्या कोणत्या पक्षाच्या कोटय़ातून द्यायच्या यावरूनही महायुतीमध्ये ताण-तणाव चालू आहे. ज्या जागा जिंकलेल्या नाहीत त्यावर महायुतीचे घोडे अडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाटा दक्षिण महाराष्ट्राचा आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध अधिक यश मिळेल या अपेक्षेने महायुतीतील अनेक घटक पक्ष अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आपली बाजू लावून धरत आहेत, त्यामुळे ही कोंडी निर्माण झाली आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील 26 पैकी 14 जागा (शिवसेना-1क् तर भाजपा-4) त्या-त्या पक्षाला केव्हाही जिंकता आलेल्या नाहीत. येथेच वाटणीवरून युतीमध्ये रस्सीखेच चालू आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नाराज माजी आमदार
-मंत्री महायुतीकडे जाऊ इच्छितात, पण त्यांचा अधिकाधिक कल भाजपाकडेच आहे. पण भाजपाकडे देण्यासाठी मतदारसंघच नाहीत.
26 पैकी 1क् जागांवर आजर्पयत भाजपा लढत आलेला आहे. तर शिवसेना उर्वरित 16 जागांवर लढली आहे.