- अतुल कुलकर्णी, मुंबईविधान परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागांवर एकमत होऊ शकले नाही. काँगे्रसने पाच जागांचा आग्रह धरल्यामुळे सोमवारची बैठक निष्फळ ठरली. आता २ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे.विधान परिषद निवडणुकीचे जागा वाटप करण्यासाठी आज दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पक्षीय बलाबल बदलले आहे. काँग्रेसची ताकद वाढली आहे, असा सूर लावत काँग्रेसने सोलापूर, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, नगर आणि मुंबई या पाच जागांवर दावा केला. अहमदनगरची जागा अपक्ष म्हणून गेल्या वेळी लढवली गेल्याने व आता नगरमध्ये आपली ताकद जास्त असल्याचे सांगत काँग्रेसने नगरवर ताबा सांगितला. नागपूर आणि अकोला-बुलढाणा राष्ट्रवादीने घ्यावे, असा प्रस्ताव काँग्रेसने त्यांच्यापुढे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. नागपूरमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ती जागा काँग्रेस जिंकू शकत नाही म्हणून ती राष्ट्रवादीला देण्याचे घाटत आहे. तर बुलडाणा-वाशिम अवघ्या चार मतांनी आम्ही हरलो तेव्हा ती जागा आम्हाला द्या, असा आग्रह राष्ट्रवादीचा आहे. अशा आहेत जागा१ जानेवारी रोजी विधान परिषदेच्या ८ जागा रिक्त होणार आहेत. त्यात मुंबईतून भाई जगताप, धुळे-नंदुरबारहून अमरिश पटेल, कोल्हापूरहून महादेव महाडिक आणि नागपूरहून राजेंद्र मुळक असे चौघे काँग्रेसतर्फे निवडून आले होते; तर दीपक साळुंके सोलापूरहून राष्ट्रवादीतर्फे विजयी झाले होते. अहमदनगरहून अरुणकाका जगताप अपक्ष म्हणून निवडून आले; पण नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. रामदास कदम शिवसेनेतर्फे मुंबईतून निवडून आले होते; तर अकोला- बुलडाणा-वाशिममधून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया निवडून आले होते.मुंबईत काँग्रेसचे संख्याबळ ७४ आहे. पहिल्या पसंतीची मते मिळवून जिंकून येण्यासाठी ७६ मतांची गरज आहे. त्यामुळे मुंबईतही काँग्रेसने नारायण राणे यांचे नाव पुढे करावे, असा काँग्रेसमधील एका गटाचा आग्रह आहे.
दोन जागांवर अडले सहमतीचे घोडे!
By admin | Published: December 01, 2015 4:22 AM