- विवेक चांदूरकर, वाशिम
फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सामुहिक शेततळे देण्यात येणार आहे. याकरिता फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना सामुहिक अर्ज कृषी विभागाकडे करावा लागणार असून, फळबागांच्या क्षेत्रफळानुसार शेततळे मंजूर करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे फळबागा कमी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात धरणांसह विहिरी, तलाव व शेततळ्यांवर आधारीत सिंचन करण्यात येत असल्याने द्राक्ष, डाळींब, मोसंबीच्या फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत.त्यातुलनेत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरडवाहू आणि खारपाणपट्टा असल्यामुळे सिंचन करण्यात येत नाही. त्यामुळे फळबाग नाहीत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी काही प्रमाणात असलेल्या संत्रा व केळीच्या फळबागही आता कमी होत आहे. त्यामुळे यामध्ये वाढ करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध नाविण्यपूर्ण योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना समुहिक शेततळे देण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी फळबाग असलेल्या चार ते पाच शेतकऱ्यांना एक गट स्थापन करावा लागणार आहे. या शेतकऱ्यांना चार शेतांच्या मध्यभागी शेततळे देण्यात येईल. हे शेततळे १०० टक्के अनुदानावर असून, शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार नाही. शेततळ्याचा आकार हा फळबागांच्या क्षेत्रफळावर अवलंबून राहणार आहे. पावसाळा व हिवाळ्यात विहिरी किंवा धरणांमध्ये जलसाठा असल्यामुळे सिंचन करता येते. मात्र उन्हाळ्यात साठा संपल्यावर पाणी नसल्याने फळबागा सुकतात. उन्हाळ्यात शेततळ्यातील पाणी फळबागांना दिल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होवू शकतो. त्यादृष्टीनेच शासनाने प्लॅस्टीकची पन्नी असलेले शेततळे १०० टक्के अनुदानावर देण्याची योजना सुरू केली आहे.सामूहिक फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्लॅस्टिकची पन्नी असलेले शेततळे देण्यात येणार आहे. १० लाख ते १ कोटी लिटर पाणी धारण क्षमता असलेले शेततळे या योेजनेंतर्गत देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे असलेल्या फळबागांना किती पाण्याची गरज आहे, याचा अंदाज घेऊन शेततळ्याचा आकार ठरविण्यात येणार आहे. विदर्भातही फळबाग वाढावी याकरिता शासनाच्यावतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे देण्यात येणार आहे. हे शेततळे १०० टक्के अनुदानावर आहे. फळबाग असलेल्या चार ते पाच शेतकऱ्यांनी अर्ज केला तर कृषी विभागाकडून शेततळे देण्यात येणार आहे. - मुरली इंगळे प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक, वाशिम