मुंबई : माजी कृषी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने कृषी विभागाने आणलेल्या फळबाग योजनेचा राज्यभरात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. आॅनलाइन-आॅफलाइनचा घोळ, खरिपाच्या पेरण्यांनंतर काढलेला आदेश यामुळे योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबरच्या मुदतीत फळबाग लागवड करणे कठीण होऊन बसले आहे. शासनाने ही मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून वारंवार करण्यात येत आहे.फुंडकर यांचे ३१ मे २०१८ रोजी निधन झाले. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा शासन आदेश ६ जुलै २०१८ रोजी निघाला. या योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी राज्य सरकार तीन टप्प्यांत १०० टक्के अनुदान देते.या योजनेसाठी आॅनलाइनऐवजी आॅफलाइन अर्ज मागविण्यात आले. आॅगस्ट २०१८ पर्यंत राज्यभरातून शेकडो शेतकºयांनी अर्ज केले. या योजनेत अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकºयांना फळबाग लागवडीसाठीची पूर्वसंमती कृषी विभागाने सप्टेंबरमध्ये दिली. तोवर यावर्षीच्या खरिपाच्या पेरण्याही झालेल्या होत्या. त्यामुळे फळबाग लागवडीसाठी शेती रिकामी ठेवता आली नाही.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे आता जवळपास संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरच्या आत फळबाग लागवड करणे शेतकºयांना शक्य नाही. त्यातच या योजनेसाठी ठिबक सिंचन अनिवार्य आहे. त्याची सोय करण्यातही शेतकºयांना अडचणी आहेत.आमच्या शेतात अजूनही कपाशी उभी आहे. त्यामुळे योजनेसाठी पात्र ठरूनही ३० नोव्हेंबरच्या आत फळबाग लागवड करणे शक्य होणार नाही. सरकारने ही मुदत किमान सहा महिने वाढवून दिली पाहिजे.- रामदास नारायण भुसावार, पात्र शेतकरी,तेलंगटाकळी, ता. केळापूर, जि. यवतमाळ३० नोव्हेंबरच्या मुदतीमुळे शेतकºयांना फळबाग लागवडीत अडचणी येत असतील, तर ही मुदत निश्चितपणे वाढवून देण्यात येईल. शेवटी योजनेचा लाभ शेतकºयांना व्हावा, हाच शासनाचा उद्देश आहे.- श्रीकांत अंडगे, अवर सचिव,कृषी विभाग.
भाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा
By यदू जोशी | Published: November 22, 2018 2:07 AM