लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुक्तीनंतरही रुग्णांना पुन्हा रुग्णालयाचा मार्ग पत्करावा लागत आहे. दिवसागणिक पोस्ट कोविड स्थितीतील गुंतागुंत वाढत असल्याचे दिसून येत आहे. पोस्ट कोविड स्थितीत रुग्णालयात पुन्हा दाखल होण्यास फुप्फुसांच्या तक्रारी हे मुख्य कारण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कोरोनामुक्त झालेल्या व्यक्ती पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याविषयी कोणतीही सांख्यिक नोंद केलेली नाही. मात्र, एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दुसरीकडे कोरोनामुक्त झालेले ज्येष्ठ नागरिक रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती राज्याच्या कोरोना मृत्यूविश्लेषण समितीचे सदस्य आणि केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. फुप्फुसांच्या तक्रारी वाढल्याने पुन्हा संसर्गाचा धोकाही वाढत असल्याचे डॉ. सुपे यांनी नमूद केले.
श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. जयेश रेड्डी यांनी सांगितले, ज्या रुग्णांना कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता अधिक असते, ते रुग्ण दीर्घकाळ रुग्णालयात उपचार घेतात. मात्र, त्यामुळे दुसरीकडे फंगस आणि अन्य विषाणूंचा धोकाही संभावतो. परिणामी, रुग्णालयातून घरी गेल्यानंतर या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, फुप्फुसाच्या तक्रारी उद्भवणे, अशा तक्रारी समोर येतात.
‘अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांकडे अधिक लक्ष द्या’nडॉक्टरांच्या मते, ज्यांना गंभीर स्वरूपाची कोरोनाची लागण झाली, असे बाधित बरेचदा शारीरिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यामुळे अशा लोकांना बरे झाल्यानंतरही काही महिने प्राणवायूची गरज भासते. मे महिन्यात मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात कोरोनातून बरे झालेले जवळजवळ १७० नवे रुग्ण दाखल झाले. nफोर्टिसच्या संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू म्हणाल्या, कोरोना विषाणू शरीरात विविध रूपांनी संक्रमित करण्यास सक्षम आहे. हा व्हेरिएंट लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांनी प्रभावित करण्यास सुरुवात करतो. कोरोनानंतर पुन्हा रुग्णालयात येणाऱ्या १००पैकी ७० लोकांत पुन्हा कोरोनाचे परिणाम आढळून आले आहेत. त्यापैकी २० टक्के रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळतात. अशा लोकांकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे.