सायलेन्स झोनची ऐसीतैसी : रुग्णाच्या मनस्वास्थ्यावर परिणामनागपूर : उपराजधानितील रुग्णालयांचा परिसर हा ‘सायलेन्स झोन’ म्हणून जाहीर केलेला आहे. पण, तरीही या परिसरात वाहनांचे कर्कश हॉर्न, डीजे व इतर कार्यक्रमांच्या आवाजांमुळे शांततेचा भंग झालेलाच असतो. त्यात दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजाने या सायलेन्स झोनची ऐशीतैशी होऊन जाते. अचानक फुटणाऱ्या सुतळीबॉम्बच्या आवाजाने रुग्ण दचकतो, अनेकवेळा त्याला जबर मानसिक धक्काही बसत असल्याने आजार बळावण्याची शक्यता असते. शहरातील बहुसंख्य रुग्णालये ही रामदासपेठ, धंतोली, सक्करदरा, प्रतापनगर, सेंट्रल एव्हेन्यू या सारख्या भरवस्तीत आहेत. रुग्णालयाच्या परिसरात हॉर्न वाजवण्यास बंदी आहे. असे असतानाही, येथून जाणारी वाहने हॉर्न वाजवत जातात. डीजेच्या तालावर मिरवणुका, वरातही जातात. याचा रुग्णांना मोठा त्रास होतो. यातच दरवर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजाने रुग्णाचे मनस्वास्थ्य पार बिघडून जाते. आधीच दुखणे त्यात या आवाजांमुळे रुग्ण चिडचिडा होतो. सुतळीबॉम्ब, पायली, फटाक्यांच्या लडी, अशा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांच्या आवाजाचा परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर होतो. अनेकवेळा फटाक्याच्या आवाजाने रुग्णाला धक्का बसून आजारातील गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या रुग्णांचा रक्तदाब वाढण्याची भीती असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती मोठ्या आवाजांना भितात. त्याचाही परिणाम आजारावर होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
रुग्णालयाचा परिसर कधी होणार ‘सायलेन्स’
By admin | Published: October 22, 2014 12:59 AM