मंचर : नोटाबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे चलती आली आहे. ढाबे, हॉटेल आता गर्दीने फुल होऊ लागले असून, राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच उमेदवारांनी जेवणावळीचा सपाटा लावला आहे. सामिष आहाराला पसंती असून, मतदान होईपर्यंत जेवणावळीचे सत्र सुरूच राहणार आहे. हॉटेल व्यवसायावरील मंदीचे सावट काहीसे दूर झाले आहे.नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला, तसाच तो हॉटेल व्यवसायालासुद्धा बसला. मंदीचे सावट आले. हातात चलन नसल्याने ग्राहकांनी हॉटेलमध्ये जाऊन खाणे बंद केले होते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना रोजचा खर्च भागविणे देखील मुश्कील झाले होते. तीन महिने हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला होता. मंचर शहरात तर काही ठिकाणी वडापाव स्वस्त करून चक्क पाच रुपयांना मिळत आहे. काही हॉटेल चालकांवर कामगार कपात करण्याची वेळ आली होती. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले. आता रणधुमाळी सुरू झाली असून नोटाबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायाला अचानक मागणी वाढली आहे. पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यामुळे हॉटेलं गजबजू लागली आहेत. शाकाहारी व मासांहारी जेवणाला प्राधान्य दिले जाते. जेवणावळी झडू लागल्या असून हे सत्र मतदान होईपर्यंत सुरूच राहणार आहे. पूर्वी प्रचार करणारे कार्यकर्ते झाडाखाली बसून डब्बे, पिठलं-भाकर, भेळ खायचे, दुपारी, रात्रीच्या वेळी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा बेत आखला जाई. आता मात्र बहुतेकांना हॉटेलची अपेक्षा असते. प्रचार करणाऱ्यांना दुपारी व रात्रीचे जेवण हे ढाबा अथवा हॉटेलमध्ये दिले जाते. काही उमेदवारांनी ठराविक हॉटेल बुक केली असून कुपन पद्धत सुरू केली आहे. काही उमेदवारांनी घरीच भटारखाना (स्वयंपाकघर) सुरू करण्याची तयारी केली आहे. घरी जेवण बनवून ते कार्यकर्त्यांना दिले तर खर्चातसुद्धा बऱ्यापैकी बचत होते. साध्या बैठकीतही पोहे-चहाचा नाष्टा दिला जात आहे. (वार्ताहर)
निवडणुकीमुळे हॉटेल, ढाबे हाऊसफुल्ल!
By admin | Published: February 10, 2017 2:57 AM