मुंबई, दि.5- मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये हॉटेल, लॉज यामध्ये देहविक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत असतात. परंतु त्यातून सूटका होण्याचे भाग्य सर्व मुलींना मिळेलच असे नाही. त्यामुळे एखादे संशयास्पद जोडपे हॉटेलमध्ये आले किंवा शरीरविक्रय होत असल्याची शंका आली तर काय करावे याची माहिती हॉटेल व्यावसायीक आपल्या कर्मचाऱ्यांना करुन देणार आहेत.
मानवी तस्करी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय मानला जातो. यामध्ये बहुतांश वेळेस महिला आणि मुलांची संख्या जास्त असते. या महिलांना मोठ्या शहरांमध्ये शरीरविक्रय करण्यासाठी भाग पाडले जाते. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशनच्या आकडेवारीनुसार मानवी तस्करीत दरवर्षी 150 अब्ज डॉलर्सची उलाढाल होत असते तसेच 2 कोटी लोक तस्करीला बळी पडतात.
हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोली हवी असेल तर ओळखपत्राची नोंद केली जाते. मात्र हा नियम योग्यरितीने पाळला जातोच असे नाही. किंवा बऱ्याचवेळेस असे ओळखपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. ग्राहकांबरोबर येणाऱ्या मुलींची अस्वस्थता, संशयास्पद वागणे तसेच तूटक संभाषण हॉटेल किंवा लॉजच्या कर्मचाऱ्यांना समजत असते. तरीही कर्मचारी अशा बाबींकडे दुर्लक्ष करतात. आता हे टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक जागरुक होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
गेल्याच आठवड्यामध्ये मुंबईत झालेल्या महिला तस्करीविरोधातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये राज्य महिला आयोग आणि हॉटेल व्यावसायिक संघटनेमध्ये याबाबत करार करण्यात आला आहे. या करारानुसार हॉटेलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महिला तस्करी रोखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच 'रेस्क्यू मी' नावाचे अॅपही तयार केले जाणार आहे. या अॅपमध्ये हॉटेलमधील कर्मचारी संशयास्पद ग्राहकाची माहिती त्याच्या रुम नंबरसकट पोलिसांना कळवू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
महिलांची तस्करी रोखण्यासाठी प्रभावी उपायमहिलांची तस्करी विविध मार्गांनी सतत होत असते. लैंगिक शोषणासाठी त्यांचा मोठ्या शहरांमध्ये वापर केला जातो. हॉटेलमध्ये ग्राहक आल्यावर त्याला ओळखपत्र विचारण्याचा नियम काटेकोरपणे राबवला जाण्याची सुरुवात या नव्या पावलामुळे होणार आहे. संशयास्पद हालचाली असणारे ग्राहक त्यांच्या देहबोलीवरुन ओळखता येतात. त्यांच्याबरोबर असलेली मुलगी भेदरलेली, घाबरलेली असेल, ग्राहक आणि मुलगी एकमेकांशी कसे बोलतात यावरुनही त्यांच्यामधील संबंधांचा अंदाज येऊ शकतो. अशा ग्राहकाला चार प्रश्न विचारले तरी त्याला संभाव्य कारवाईची जाणिव होऊन तो हा प्रकार थांबवू शकतो. त्यामुळेच महिला आयोगाने पुढाकार घेऊन हॉटेल व्यावसायिकांच्या मदतीने हा करार केला आहे. हॉटेल व्यवसायात नव्य़ाने येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रशिक्षण काळातच या बाबींचे ज्ञान दिले तर त्याचा उपयोग अधिक होईल. यामध्ये चांगल्या सामान्य ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. विजया रहाटकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग