- विनोद पवार, राजापूर (जि.रत्नागिरी)
इथे सगळ्यांना घर आहे पण कुणाच्या घराला गेली कित्येक वर्षे दरवाजेच नाहीत. नवीन घर बांधायचे असेल तरी कोणी त्या घराला मुख्य दरवाजा लावण्याचे नावही घेत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा राजापूर तालुक्यातील फुपेरे गावातील लिगमवाडीचे ग्रामस्थ कटाक्षाने पाळत आहेत. विशेष म्हणजे, असे असतानाही गेल्या कित्येक वर्षांत या वाडीत चोरी झाल्याचे ऐकिवात नाही. शनिशिंंगणापूरनंतरचे दुसरे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असे हे गाव वैशिष्ट्यपूर्ण मानले जात आहे.सुमारे तीन-चारशे वर्षांपूर्वी तालुक्यातील देवीहसोळ येथून स्थलांतरित होऊन फुपेरे येथे स्थायिक होताना एका शेतकरी कुटुंबातील एकाने गावच्या देवीचा कौल घेतला. त्या वेळी गावच्या देवीने ‘तू या गावात उघड्या दाराने नांद, तरच तू सुखी राहशील,’ असे सांंगितल्याची आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे. कित्येक पिढ्यांपूर्वी येथील ग्रामदेवतेने दिलेला हा आशीर्वाद आजही आपल्या पाठीशी असल्याचा दृढ विश्वास येथील ग्रामस्थांमध्ये आहे. घरांना दारे नसल्याच्या प्रथेमुळे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण कोकणात वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.केवळ बांबूंचा आडोसाएखाद्या घरातील सर्व सदस्यांना जर बाहेरगावी जायचे असेल तर केवळ या दरवाजाच्या ठिकाणी बांंबूचा आडोसा केला जातो व त्या बांबूच्या काठ्यांना दोरीच्या साहाय्याने बांधले जाते.प्रथा फक्त गावापुरतीचराजापूर रोड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर डोंगरदरीत वसलेल्या फुपेरे गावामध्ये चार वाड्या असल्या तरी ही प्रथा फक्त लिगमवाडीपुरतीच मर्यादित आहे.फुपेरे लिगमवाडीत सुमारे २० घरे असून, यामध्ये जवळजवळ ४५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. या २० घरांना गेल्या कित्येक वर्षांत मुख्य दरवाजा लागलेला नाही. एखाद्या कुटुंबाला वेगळे नवीन घर बांधायचे असेल तर या वाडीच्या सीमारेषेत ते घर बांधताना त्या घराला दरवाजा लावला जात नाही.