ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये असताना वास्तव्य केलेल्या घराच्या खरेदीसंदर्भातल्या अडचणी दूर झाल्या असून ३१ कोटी रुपयांना हे घर तात्काळ खरेदी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याचे वृत्त आहे. बाबासाहेबांनी सन १९२१ - २२ या कालावधीत येथे वास्तव्य केले होते. सुरुवातीला हे घर राज्य सरकार खरेदी करणार की केंद्र याबाबत संदिग्धता होती. ती दूर झाल्यानंतर राज्य सरकार खरेदी करणार हे स्पष्ट झाले.
राज्य सरकारने जुलैमध्ये ४० कोटी रुपयांची तरतूद केली आणि घराच्या किमतीच्या १० टक्के रक्कम घरमालकाला टोकन म्हणून दिली. त्यानंतर यासंदर्भातली प्रगती तांत्रिक कारणांचे नाव पुढे करत थंडावली. अखेर त्या घरमालकाने जर राज्य शासनाने घर विकत घेतले नाही तर पुन्हा निविदा काढण्याची तंबी दिल्यावर राज्य सरकारला व संबंधितांना जाग आली. अखेर राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी यावर शिक्कामोर्तब केले असून उर्वरीत कार्यवाही तातडीने करण्याचा निर्णय घेतला आहे.