जालना : बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये पुनर्लेखनाद्वारे गुणवाढ करण्याच्या रॅकेटमध्ये दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात अंबड तालुक्यातील रोहिलागड येथून पोलीस पथकाने बुधवारी राजेंद्र पाटील आणि शिंदे (पूर्ण नाव कळू शकले नाही) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी घरात व शेतात उत्तरपत्रिका पुरल्या होत्या.त्यांच्याकडून १५० पुनर्लिखित उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत. सुरुवातीला आडेवेढे घेणाऱ्या दोघांना खाक्या दाखविताच घरात आणि शेतात पुरुन ठेवलेल्या पुनर्लेखन झालेल्या तब्बल दीडशे उत्तरपत्रिका त्यांनी पोलिसांना दिल्या. या उत्तरपत्रिका श्रीमंत वाघ यानेच दोघांना दिल्याचे तपासात आढळून आले आहे. जालन्यातील अंबड रस्त्यावरील संस्कार वसतिगृहावर छापा टाकून पुनर्लेखन केलेल्या २,५०० आणि पाच हजार कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त केल्या करण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी अटक केलेल्या श्रीमंत वाघ, अंकुश पालवे आणि सुदीप राठोडच्या चौकशीतून पोलिसांना दररोज धक्कादायक माहिती मिळत आहे. मंगळवारी ताब्यात घेतलेल्या राजूर येथील महाविद्यालयातील प्रा. एस. एम. दाभाडे याच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांवर दबाव?गुणवाढ प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. सध्या हे पथक रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी संपूर्ण मराठवाडा पालथा घालत आहे. मात्र, काही ठिकाणी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी जात असतानाच पथकाला परत बोलावले जात आहे. त्यासाठी पथकावर आणि पोलिसांवर कुणाचा दबाव येत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
घरात, शेतात पुरल्या बारावीच्या उत्तरपत्रिका!
By admin | Published: March 24, 2016 2:02 AM