लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिका निवडणुकीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचे व ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात सवलत देण्याचे आश्वासन शिवसेनेकडून पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभागृह नेते यशवंत जाधव यांनी मालमत्ता कर माफ करण्याबाबतच्या ठरावाची सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना सादर करण्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रावर पुढील महिन्यापर्यंत कारवाई करून महासभेत ठरावाची सूचना मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर शिवसेनेवर कडाडून टीका झाली होती. शिवाय भाजपासह विरोधकांकडूनही या मुद्द्यावरून शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. जकात कर बंद होण्याच्या मार्गावर असताना उत्पन्नाचा मोठा मार्ग असलेल्या मालमत्ता कर माफीने पालिका प्रशासन आर्थिक कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. मात्र आश्वासनपूर्तीसाठी सेनेला ही जोखीम उचलण्याची गरज आहे की नाही, यावर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात या आश्वासनाला गती मिळाल्याचे कळते.तरी जीएसटी लागू होण्यापूर्वी या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. म्हणूनच मंगळवारी ५०० चौरस फुटांना मालमत्ता कर माफ आणि ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ६० टक्के सवलत देण्याची ठरावाची सूचना सभागृहात आणावी, अशी मागणी जाधव यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. या महिन्यात पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून त्यास तत्काळ मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना दिलासा मिळणार
By admin | Published: June 22, 2017 4:45 AM