ठाणे: शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत असतानाचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोत १० रुपयांच्या थाळीसोबत मिनरल वॉटरची बाटली दिसत असल्यानं अनेकांनी आव्हाड यांना ट्रोल केलं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आज खुलासा केला. या फोटोमागची संपूर्ण कहाणी त्यांनी सांगितली. 'आपलं महानगर' वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 'मी २६ जानेवारीला शिवभोजन थाळी केंद्राचं उद्घाटन केलं. त्यावेळी काही लोकांनी पाण्याची बाटली दाखवली. ती बाटली मी घेतलेली नव्हती. हॉटेलचे मालक बिस्लेरीच्या रिकाम्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन हॉटेलमध्ये वापरतात. मलादेखील जुन्याच बाटलीतून पाणी भरुन देण्यात आलं होतं. पण मनसेच्या अमेय खोपकरांनी बिस्लेरीचा फोटो टाकला आणि मग त्यावरुन ट्रोलिंग सुरू झालं,' असं आव्हाड यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी ट्रोलिंगबद्दल नाराजीदेखील व्यक्त केली. सध्या ट्रोल नावाची नवी आर्मी तयार झाली आहे. पण सामाजिक व्यवस्थेसाठी ही गोष्ट चांगली नाही, असं आव्हाड म्हणाले.तंत्रज्ञानाचा वापर समाज सुधारणेसाठी करायचा की समाजात मानसिक विकृती पसरवण्यासाठी, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. 'आज ज्या प्रकारचे मिम्स तयार केले जातात, तसे विकृत प्रकार याआधी कधीही झालेले नव्हते. त्यामुळेच अनेक वक्ते त्यांचे शब्द जपून वापरतात. कारण बोलणं एकदा रेकॉर्ड झालं की दुसऱ्या दिवशी त्यावरुन वाद होऊ शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणाऱ्या या विकृतीचा तरुणाईनं विचार करणं आवश्यक आहे,' असं आव्हाड यांनी म्हटलं.
'ती' बाटली नेमकी आली कुठून?; ऐका जितेंद्र आव्हाडांच्याच तोंडून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 9:47 PM