मुंबई : राज्याचे प्रस्तावित नवीन गृहनिर्माण धोरण चालू महिनाअखेर तयार करु न ते मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर सादर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या धोरणासंबंधीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्वसामान्यांना परवडणारी घरे तसेच अन्य गृहनिर्माणबाबींविषयक राज्याचे नवीन धोरण अंतिम टप्प्यात आहे. या धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात यावा. राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील जमिनींवरील झोपडपटट्यांचा विकास करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. मात्र यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकास करण्याबाबत धोरण तयार करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, महसुल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितिन करीर आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
गृहनिर्माण धोरण महिनाभरात
By admin | Published: January 14, 2016 12:22 AM