मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: एकीकडे 18 ते 44 वयोगटातील तरुणांसाठी अजून तरी महापालिके कडून लसीकरण मोहिम सुरू झाली नाही. गेल्या मे महिन्यात सुरवातीला या वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण मोहिम सुरू झाली, मग लसींच्या अभावी सदर मोहिम ठप्प झाली आहे. दि,21 जून पासून या वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
आज लस ही जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.त्यामुळे तरुणांना सुद्धा लस हवी आहे. महापालिकेच्या नियमानुसार खाजगी हॉस्पिटल व गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पालिकेच्या परवानगीने लसीकरण करू शकतात.त्यामुळे पश्चिम उपनगरात खाजगी हॉस्पिटल व गृहनिर्माण संस्था या एकत्र येऊन 18 ते 44 वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण मोहिम राबवत असून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पश्चिम उपनगरातील विविध राजकीय पक्षांचे आमदार,नगरसेवक यांच्या सहकार्याने लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे.
लसीकरणासाठी खाजगी हॉस्पिटल कडून सुमारे 780,850 ते 1000 पर्यंत दर आकारले जात असून गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात किंवा हॉल मध्ये लसीकरण मोहिम राबवण्यात येते. बाहेर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन रांगेत लाईन लावून लस घ्यायची,यापेक्षा पैसे गेले तरी चालतील,पण कोरोना पासून बचाव होण्यासाठी आपल्या सोसायटीच्या आवारात आपल्या सदस्यांना लस देण्यासाठी अनेक गृहनिर्माण संस्था पुढे आल्या आहेत. पश्चिम उपनगरात अनेक गृहनिर्माण संस्था लाईफ लाईन हॉस्पिटल आणि इतर खाजगी हॉस्पिटलशी सामंजस्य करार करून खाजगी लसीकरणाकडे तरुणांचे आणि येथील जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी पश्चिमउपनगरात अनेक गृहनिर्माण सोसायट्या पुढे आल्याचे चित्र आहे. दिंडोशीत घेतली 550 नागरिकांनी लस
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर व आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू , विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या आशीर्वादाने आज शिवसेना शाखा क्र.४४चे शाखाप्रमुख सुभाष धानुका यांच्या मार्फत वदिंडोशी डेपोच्या मागे असलेल्या लाईफ लाईफ लाईन हॉस्पिटल मार्फत वसंत व्हॅली कॉम्प्लेक्स येथील नागरिकांसाठी कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात आली. येथील सुमारे 550 नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.
या लसीकरण मोहिमेचे उदघाटन आज सकाळी आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते झाले. यावेळी कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश बेले,लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ.अनिरुद्ध आंबेकर, विधानसभा संगठक संतोष धनावडे, उपविभागप्रमुख प्रदीप ठाकूर, शाखाप्रमुख सुभाष धानुका, रोट्रॅक्ट क्लब ऑफ मुंबई वेस्टर्न इलाईटच्या तनुश्री सराफ व हर्षवर्धन सराफ,तसेच बिपिन पटेल, संदीप पोवार, मुराद खान, चेतन वेस्वीकर, प्रिया शर्मा , रोमेश मिर्ज़ा , रमेश शिंदे, राजेश जंगम, कैलाश मुरारका आदी मान्यवर उपस्थित होते.