Ajit Pawar Amol Kolhe : अजित पवार, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो बॅनरवर असल्याची चर्चा सुरू झाली. याबद्दल काही वृत्तवाहिन्यांनी बातम्या दिल्या. याचा उल्लेख करत अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत समाचार घेतला. अमोल कोल्हे यांचा फोटो कसा, याबद्दल त्यांनी उत्तर दिले.
अमोल कोल्हेंचा फोटो कसा?
"मला तर अजून एक माहिती मिळाली. टीव्हीवरही चालले आहे. आता बघा हा बोर्ड आहे. बोर्डावर अमोल कोल्हेंचा फोटो लावला आहे. ते या भागाचे खासदार म्हणून लावला आहे. लगेच टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज. अजित पवारांच्या कार्यक्रमाला कोल्हे साहेबांचा फोटो. अरे ते खासदार म्हणून निवडून आलेय म्हणून तिथे लावला", असे अजित पवार म्हणाले.
"मी कुठे म्हणतोय ते माझ्या पक्षात आलेय. त्याच पक्षात आहे. ही काय ब्रेकिंग न्यूज आहे का? आज सार्वजनिक कामाची उद्धाटने होती. तुम्ही सगळे बोर्ड बघितले. त्या बोर्डवर सगळ्यांची नावे आहेत. त्या खात्याच्या मंत्र्याचे आहे. आमदाराचे आहे. शिवाजीराव आढळराव पाटील म्हाडाचे प्रमुख आहेत, त्यांना कॅबिनेटचा दर्जा आहे. आणि ते (अमोल कोल्हे) खासदार आहेत. त्यांची नावे टाकावी लागतात", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
"मग ते का बोर्ड दाखवत नाही. अरे इथे कोल्हे साहेब आलेले नसताना त्यांचे नाव टाकले होते. तुम्हाला मूभा आहे. काय दाखवायचे, तो तुमचा अधिकार आहे. पण, काहीही मागचा पुढचा विचार करायचा नाही. ब्रेकिंग न्यूज. हे सगळे कार्यक्रम सार्वजनिक आहेत", असे अजित पवार म्हणाले.
त्या आमदाराला फोन केला, तो म्हणाला इथेच आहे
"मध्ये मी एक बातमी बघितली. अमूक अमूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांच्या जवळचे आमदार असे असे कुणाला भेटायला गेले. त्या आमदाराला फोन केला, काय रे? तो म्हणाला दादा मी इथेच आहे. मी कुठे गेलोच नाही. मी कशाला कुठे जातोय. काय, कशाला कुणाची बदनामी करता?", असा मिश्कील भाषेत अजित पवारांनी माध्यमांवर निशाणा साधला.
"मध्ये तर माझ्याबद्दल असेच उठवले. म्हणाले दिल्लीला जाताना अजित पवार बहुरुपी बनून जायचे. आता अजित पवारला ३५ वर्षात अख्खा महाराष्ट्र ओळखतो. मी विरोधी पक्षनेता. विमानतळावर ओळखपत्र दाखवावे लागते. ते फोटो आणि आपल्याला बघतात. मग जा म्हणतात. अरे कुणी सांगितले तुम्हाला? जायचे तर उजळ माथ्याने जाईल ना?", असे अजित पवार म्हणाले.