Jaydeep Apte Arrest Latest Update : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पण, बुधवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी तो लपून छपून घरापर्यंत पोहोचला अन् पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आपटेच्या अटकेची सगळी माहिती आली आहे.
मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर वर्षभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. त्यानंतर पोलिसांनी जयदीप आपटेविरोधात गुन्हा दाखल केला होता. घटना घडल्यापासून जयदीप आपटे फरार होता. त्याच्याविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीसही काढली होती. सगळी शोध सुरू असताना जयदीप आपटे कल्याणमध्येच पोलिसांना सापडला.
कसाऱ्याहून कल्याणमध्ये आला
मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे हा कसाऱ्याहून लोकल ट्रेनने कल्याणमध्ये आला. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर तो रिक्षामध्ये बसला. रिक्षाने तो दूध नाका परिसरात आला. कुणाला ओळखता येऊ नये म्हणून त्याने डोक्यावर टोपी घातली होती आणि चेहरा मास्कने झाकलेला होता. जयदीप आपटेच्या हातात दोन बॅगा होत्या.
कसाऱ्याहून जयदीप आपटे त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आला होता. इमारतीच्या गेटपर्यंत जयदीप आपटे पोहोचला. इमारतीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त लावलेला होता. पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र बघून आत सोडले जात होते.
...अन् जयदीप आपटे रडायला लागला
इमारतीच्या गेटजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी जयदीप आपटेकडे ओळखपत्र मागितले. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला न्यायाहाळून पाहिले, तेव्हा त्यांना संशय आला. एका कर्मचाऱ्यांने त्याचे नाव घेत आवाज दिला आणि घाबरलेला जयदीप आपटे रडायला लागला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जयदीप आपटेने कुटुंबीयांना भेटू देण्याची विनंती केली. पोलिसांनी त्याला अटक केल्याने बरीच गर्दी जमली. गर्दी बघून जयदीप आपटेची आई आणि पत्नी खाली आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीत बसवले आणि पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले.