ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर अभिनेता संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईत परत आला तेव्हा जणू काही तो फार मोठी कामगिरी फत्ते करून आला आहे, अशा थाटात त्याचे स्वागत झाले. एवढे कशाला तुरुंगातून बाहेर पडल्यावर संजय दत्तने तेथील मातीला नमन करून तिरंग्या झेंड्याला सॅल्युट ठोकल्याचे जे दृश्य टीव्हीवर दिसले तेही खरे तर त्याच्या एका आगामी चित्रपटाचे पद्धतशीर आयोजित केलेले चित्रिकरण होते. म्हणजेच एक गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगून संजय दत्तच्या घरवापसीचे केवळ उदात्तीकरणच नव्हे तर व्यापारीकरणही केले गेले.
असे उदात्तीकरण कितपत योग्य असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिक्षा भोगून पूर्ण झालेला कैदी या नात्याने संजय दत्त व याकूब मेमन या दोघांमध्ये फरक काय? दोघांनाही मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झाली होती. संजय दत्तचा तुरुंगवासाचा निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यावर त्याची शिक्षा पूर्ण झाली. तसेच गळ््याभोवती फास आवळला जाऊन प्राण गेले तेव्हा याकूब मेमनची शिक्षा पूर्ण झाली होती.
असे असले तरी याकूब प्रेत दफनविधीसाठी कुटुंबियांच्या हवाली करायचे की नाही याचा निर्णय करताना इतर गोष्टींबरोबरच त्याचे उदात्तीकरण होणार नाही, याचा विचार केला गेला. नव्हे त्याच्या कुटुंबियांकडून तशी अलिखित हमी घेऊनच मृतदेह ताब्यात देण्यात आला. तरीही अंत्ययात्रेच्या वेळी माहिमला मोठा जनसमुदाय जमला तेव्हा अनेकांच्या कपाळावर अठ्या चढल्या होत्या.
मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याच्या वेळी पोलीस व लष्कराच्या कारवाईत ठार झालेल्या कसाबच्या नऊ सहकाऱ्यांच्या पार्थिवांचेही गुपचूप दफन केले गेले. कुठे दफन केले हे कळले तर कदाचित देशविघातक शक्तींसाठी ते स्फूर्तिस्थान व तीर्थस्थळ ठरेल, हा त्यामागचा विचार होता. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला ठार मारले व त्याच्या मृतदेहाची समुद्रात अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली. यामागचा हेतूहू तोच होता. मग संजय दत्तच्या बाबतीतही ही खबरदारी का घेतली नाही? एक सेलिब्रिटी म्हणून?