राहुल नार्वेकरांसारखे सुशिक्षित चतुर कसे काय बोलू शकतात; जितेंद्र आव्हाडांची अध्यक्षांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 12:54 PM2023-05-17T12:54:05+5:302023-05-17T12:54:45+5:30
कोण राजकीय पक्ष होता? महाराष्ट्राला मूर्ख समजता का? शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे फेब्रुवारीमध्ये गेला. २२ जुलैला त्यावरून निर्णय कसा लावणार, असा सवाल आव्हाड यांनी केला.
परदेशातून परतल्यानंतर विधानसभेमध्ये येत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये त्यांनी आपण तेव्हाचा राजकीय पक्ष कोणाच्या ताब्यात होता, व्हीप कोण होता आदींसह शिवसेनेचे संविधान तपासणार असल्याचे म्हटले होते. यावरून राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
सुप्रिम कोर्टाच्या निकालावर टिपणी करणे म्हणजे शिंदे गटाची बाजू घेणे आहे. ज्या पदावर ते आहेत, सुप्रीम कोर्टाचे म्हणणे त्यांचे म्हणणे या दोन्ही गोष्टींमध्ये विरोधाभास आहे. कोर्टाने स्पष्टपणे तुम्हाला मर्यादा आहे, असे म्हटले आहे. कोर्टाने पक्षातील फूट नाकारली आहे. ते नाही म्हटल्यावर काय उरतेय, असा सवाल आव्हाड यांनी केला.
राजकीय पक्षाने नेता आणि व्हीप नेमणे अपेक्षित आहे, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोण राजकीय पक्ष होता? महाराष्ट्राला मूर्ख समजता का? शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे फेब्रुवारीमध्ये गेला. २२ जुलैला त्यावरून निर्णय कसा लावणार, असा सवाल केला. तसेच मला आश्चर्य वाटतेय त्यांच्या सारखा सुशिक्षित चतुर असे कसे काय बोलू शकतो? हे रूल बुक आहे. नार्वेकर तर मोठे वकील आहेत, आम्ही अनपढ आहोत, अशी टीका आव्हाड यांनी केली.
आम्हाला काय करायचेय, त्याचे रिपोर्ट कार्ड तपासा नाही तर काही करा. सुप्रीम कोर्टाने अधिकार दिले म्हणून त्यांच्या निकालावर टिपणी करणे म्हणजे एक बाजू घेणे होते. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून सुप्रीम कोर्टाने सांगितले तसे निर्णय घ्या, असे आव्हाड म्हणाले.