काल शिवतीर्थावर बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला, बाळासाहेबांच्या भूमिकेला तिलांजली दिली. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, ते शिवसैनिक कसले? बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत. स्मृतीस्थळावर सगळ्यांनी यायला हवे. पण, काल येऊन ज्यांनी नौटंकी केली, त्यांना शिवसैनिक आम्ही कधीच मानणार नाही. त्यांच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी अजिबात श्रद्धा नाही, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे हे देशातील, समाजकारणातील महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती, तर स्वाभिमानाने ताठपणे उभा राहिलेला माणूस आपल्याला दिसला नसता. बाळासाहेब ठाकरे नसते तर जी हिंदुत्वाला जाग आलेली आहे, ज्या राष्ट्रवादाची बात राज्यकर्ते करत आहेत, ती त्यांना कधीच करता आली नसती. त्यांनी मुंबई सह महाराष्ट्र अखंड ठेवला. आमच्यासारखे असंख्य लोक जे समाजकारणामध्ये काम करत आहेत ते त्यांच्यामुळे. आम्ही दिल्लीत गेलो, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, ते फक्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेमुळेच असे राऊत म्हणाले.
संत तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे याची आठवण करून देताना राऊतांनी शिंदे गटावर टीका केली. तुमच्या मनात श्रद्धा नाही, भाव नाही आणि तुम्ही स्मृतीस्थळावर येऊन नौटंकी करत आहात. कोणी काहीही म्हणू दे काल जो प्रकार घडला, निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला, हा कालचा ट्रेलर आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आज आहे, असे राऊत म्हणाले.