मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का, याबातत राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची तब्येत आणि त्यांच्या विधिमंडळातील उपस्थितीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
आज अधिवेशनासाठी विधिमंडळात येताना प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्र्यांची प्रकृती आणि अधिवेशनातील त्यांच्या उपस्थितीबाबत विचारणा केली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. ते विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांना योग्य वाटेल तेव्हा योग्य वेळी ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने सलग दुसर्या वर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. २२ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होणार्या पाच दिवसांच्या अधिवेशनात आघाडी सरकारला घेरण्यासाठी भाजपकडे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन तापणार असून भाजपच्या हल्ल्याला तोंड देणे आघाडीसाठी आव्हानात्मक आहे. अधिवेशनात ओबीसी आरक्षण, शासकीय भरतीच्या परीक्षा घेण्यात आलेले अपयश, एसटीचा चिघळलेला संप, महापालिका व नेतेमंडळींवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आदी मुद्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यात विरोधक आक्रमक होणार त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी देखील तयारी केली आहे.
विरोधी पक्ष भाजपने अधिवेशनात आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर भाजप विरुद्ध आघाडी सरकार असा सामना सभागृहात रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हे अधिवेशन हिवाळी की वादळी ठरतंय हे पाहणे पुढील दिवसात महत्त्वाचे ठरणार आहे.