- डॉ. अमोल अन्नदाते यथा वैद्ये समर्पणम्!तथा सिद्धे चिकित्सा !!आजच्या आयुष्यात प्रत्येक कुटुंबात एक फॅमिली डॉक्टर असणे अत्यंत गरजेचे आहे. फॅमिली डॉक्टरही तसे तीन-चार प्रकारचे असतात किंवा तीन-चार प्रकारच्या डिग्रीधारक असतात. उदाहरणार्थ एम.डी., एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस. अशा प्रकारच्या पदव्या डॉक्टरांच्या ज्ञान शाखा व प्रावीण्य यावर अवलंबून असतात. यापैकी कोणताही डॉक्टर हा आपला फॅमिली डॉक्टर असू शकतो. जनरल प्रॅक्टिस करणारे बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस व विशेष प्रावीण्य असणारे एम.डी., एम.बी.बी.एस. दोन्हीही प्रकारच्या डॉक्टरांच्या संपर्कात असणे गरजेचे आहे. किरकोळ किंवा साधारण तक्रार असल्यास आपणास जनरल प्रॅक्टिस करणाºया डॉक्टरची मदत होऊ शकते. परंतु काही गंभीर प्रॉब्लेम झाल्यास आपणास विशेष प्रावीण्य असलेले किंवा स्पेशालिटी डॉक्टरचीच आवश्यकता असते.डॉक्टरच्या बाबतीत एक गोष्ट मात्र टाळली पाहिजे, ती म्हणजे वारंवार डॉक्टर बदलणे. आपल्याला एक-दोन भेटीतच हे लक्षात येत असते की आपला डॉक्टर कसा आहे. त्याचे कौशल्य किती आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्याशी आपले जमणार आहे की नाही? ज्या प्रकारे लग्न करताना आपण पूर्ण आयुष्याचा विचार करूनच निर्णय घेतो साधारणत: त्या पद्धतीने आपण आपला फॅमिली डॉक्टर निवडावा. आपल्या अंतर्मनाला ज्यावर विश्वास वाटेल, ज्याच्याशी आपण मोकळेपणाने बोलू शकतो असाच डॉक्टर फॅमिली डॉक्टर म्हणून निवडावा व नंतर मात्र वारंवार डॉक्टर बदलू नये. अगदी मित्रही वारंवार बदलले तरी आयुष्यात स्थिरता नसते. तर डॉक्टर हा जितक्या अधिक वेळापासून आपणास ओळखत असेल तितके निदान करणे हे सोपे असते.एखाद्या डॉक्टरविषयी आपले मत डळमळीत असेल तर त्यास डॉक्टर म्हणून निवडू नये. आपला आपल्या फॅमिली डॉक्टरवर असणारा विश्वास हा आपल्या बरे होण्यामध्ये एक महत्त्वाचा पैलू असतो.ज्या वेळी गंभीर परिस्थितीत पुढील उपचारासाठी आपल्याला मोठ्या डॉक्टरांकडे जावे लागते, त्या वेळी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा. पण तो जर विशिष्ट डॉक्टरकडे जाण्याचा जास्त आग्रह करत असेल व आपण न गेल्यास त्याची वैयक्तिक चिडचिड होत असेल तर ते चांगले नाही. आज वैद्यकीय क्षेत्रात ज्या अनेक स्पेशालिटी निर्माण झाल्या आहेत त्यांची रुग्णास माहिती असणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या डिग्रीवरून किंवा त्यांच्या नावापुढे असलेल्या उपाधीवरून नेमक्या कुठल्या प्रॉब्लेमसाठी त्यांच्याकडे जावे हे अनेकांना अजूनही लक्षात येत नाही. उदा. एंडोक्रायनोलॉजी, नेफ्रोलॉजी, आँकोलॉजी, पल्मोनोलॉजी, व्हेनेरोलॉजी यासारख्या ‘जी’ वेळ काढून आपल्या फॅमिली डॉक्टरकडून किंवा इंटरनेटवरून समजून घ्याव्या. म्हणजे आपल्याला होत असलेल्या त्रासावरून त्या त्या स्पेशालिटी डॉक्टरकडे जाता येईल व यासाठी आपल्या जनरल प्रॅक्टिशिअनवर संपूर्ण अवलंबून राहावे लागणार नाही. तसे प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी स्पेशालिस्टकडे जाण्याची गरज नसते आणि बहुतांश समस्या या एम.बी.बी.एस. नंतर बेसिक पदव्युत्तर डिग्री असलेल्या डॉक्टरकडून सुटू शकतात.डॉक्टर निवडताना आजकाल बºयाचदा त्याच्या कौशल्यापेक्षा त्याच्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकच्या इन्टेरिअर डेकोरेशनकडे लक्ष जाते. म्हणून अनेक जण डॉक्टरचे ग्लॅमर आणि कपडे पाहून डॉक्टर निवडतात. त्यामुळे आजकाल कॉर्पोरेट रुग्णालयांकडे रुग्णांचा ओढा आहे. बालरोगशास्त्रामधील भीष्म पितामह पुण्यातील डॉ. धैर्यशील शिरोळे हे एका भव्य झाडाखाली पेशंट बघायचे. मूल अस्वच्छ असले तर त्यांच्या समोरच असलेल्या नळावर आईला आंघोळ घालायला लावायचे. वैद्यकीय प्रॅक्टिसमधला हा अनौपचारिक जिव्हाळा आता राहिला नाही, कारण रुग्णांनाच तो रोचत नाही.डॉक्टर निवडताना बºयाचदा रुग्ण त्यांचा स्वभाव कसा आहे हेही बघतात. गोड बोलण्याने अर्धा आजार बरा होतो व गोड बोलणारा डॉक्टर हा केव्हाही चांगला. पण डॉक्टर हुशार असेल व त्याचे उपचार चांगले असतील तर त्याच्या स्वभावाकडे फार लक्ष देऊ नये. खरे तर कडवट बोलणारा डॉक्टर हा स्पष्टवक्ता असतो व गोड बोलणाºया डॉक्टरइतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त चांगला असतो.लागू पडणारे औषध हे नेहमी कडूच असते. औषध जितके कडू तितके ते अधिक गुणकारी असे समजून आपल्या चांगल्या डॉक्टरचा शीघ्रकोपी स्वभाव पोटात घ्यावा. उपचारांमधील अनुभवच आपल्याला कालानुरूप डॉक्टर निवडण्याची हुशारी देतो.- amolaannadate@yahoo.co.in
डॉक्टर कसा निवडावा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 4:25 AM