राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त होत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे. आपल्याला बदनाम करायचे, आपल्याला सलाइनमधून विष द्यायचे अथवा आपले एन्काउंटर करायचे, देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न आहे, असे देवेंद्र फडणवीसांना वाटते," असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला आहे. एवढेच नाही तर, काही लोकांना पुढे करून आपल्याला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. संपवण्याचे कटकारस्थान होत आहे. यामुळे, आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत जरांगे आपल्या जागेवरून उठले. यावेळी उपस्थितांनी त्यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते गाडीत बसून मुंबईकडे निघाले. या संपूर्ण प्रकारानंतर, आता राष्ट्रवादी काँग्ररेस नेते छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले भुजबळ? -"मराठा समाजाला विधानमंडळात एकमाताने स्वतंत्र्य आरक्षण दिले आहे. सर्व आमदारांनी आणि सर्व पक्षांनी ते एकमताने केले आहे. तसेच सर्व विरोध पक्षांचे नेते, मग ते काँग्रेसचे असतील, पवार साहेब असतील, शिवसेनेचे असतील किंवा महायुतीचे असतील, त्यांनी हेच सांगितले होते, की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचे काम करा. त्याप्रमाणे ते झाले. यानंतर जरांगेंनी अशी आदळ आपट करण्याचे काय कारण आहे?" असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी केला.
भुजबळ म्हणाले, "आता त्याचेच लोक त्याच्य विरोधात आरोप करायला लागले आहेत. त्यामुळेच कदाचित त्रस्त होऊन हे अकांडतांडव त्यांनी सुरू केलेले असेल, असे मला वाटते. कारण, आता त्यांचे पितळ उघडे पडत चालले आहे. त्यात त्यांनी केलेल्या गुप्त बैटका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाची त्यांनी जी दिशाभूल केली आहे, हे सर्व आता त्यांचेच लोक बोलायला लागले आहेत. यामुळे कदाचित त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल, त्यामुळेच ते आता काही तरी बोलत आहेत."
एवढेच नाही तर, "माझे त्यांना म्हणणे आहे की, तुम्ही आधी तब्बेत सांभाळा. मला मोठं आश्चर्य वाटतं की, उपोषण करत असतानाही त्यांचा आवाज मात्र फार खणखणीत आणि मोठा आहे. हे कसं काय आहे? आणि ते 10 लोकांनाही ऐकत नव्हते, एवढी शक्ती त्यांना उपोषण कर्त्याला कशी काय आली? हेही वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं आश्चर्य आहे," असा उपरोधिक टोलाही भुजबळ यांनी यावेळी जरांगेंना लगावला.