अफजलखान म्हणणाऱ्यांच्या पुढे नतमस्तक कसे झाले? धनंजय मुंडे यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 07:36 PM2019-04-24T19:36:10+5:302019-04-24T19:47:54+5:30
मुख्यमंत्री शिवसेनेला म्हणतात वाघाच्या जबड्यात मोजतो दात , त्यांनी जबड्यात हात घातला पण दातच नव्हते.
तळेगाव ढमढेरे : भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे अफजलखान आहेत , त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवले तर त्यांचा कोथळा बाहेर काढू अशी टीका करणारे उद्धव ठाकरे ईडीची चौकशी होऊ नये म्हणून ते कमळाबाई समोर नतमस्तक झाले आहेत. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुजरातला गेले , उद्धव ठाकरे हे साधे ग्रामपंचायत सदस्य , जिल्हा परिषद सदस्य , किंवा आमदार , खासदारही नाहीत. तरीही त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली याचा जाब ठाकरे यांनी द्यावा, असे जाहीर आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तळेगाव ढमढेरे येथे आयोजित जाहीर सभेत केले .
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारा निमित्त तळेगाव ढमढेरे येथील प्रचार सभेत मुंडे हे बोलत होते.
मुंडे म्हणाले , ‘‘साडेचार वर्ष उद्धव ठाकरेंनी भाजपाला इतक्या लाथा मारल्या कि गिनिज बुकवाले रेकॉर्ड घेण्यासाठी येतील. लाथा मारल्याने ठाकरे यांचे पाय लांब झाले आहे. शहांना उद्देशून ठाकरे म्हणाले होते कि अफजल खान चालुन येणार. मी त्यांचा कोथळा बाहेर काढणार पण प्रत्यक्षात मात्र स्वत: ठाकरे अफझल खानाच्या शमियानात मुजरा करायला गेले. का तर ‘ईडी’ची पिडा टळो दे म्हणून. मुख्यमंत्री शिवसेनेला म्हणतात वाघाच्या जबड्यात मोजतो दात , त्यांनी जबड्यात हात घातला पण दातच नव्हते.
मोदी हे नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा, स्कील, स्टार्ट अप विषयी का बोलत नाहीत ? कारण मोदी हे एक नंबर फेकू आहेत. औसा येथे शहिदांच्या नावाने मत मागता , यापूर्वी अटलजींनी कारगिलच्या नावाखाली शहिदांच्या नावाने कधी मत मागितलं नाही . नोटबंदीतील नुकसान , मोठी मंदी आली , पुलवामा झाला या सर्वांची जबाबदारी मोदींनी घ्यावी.
खासदार आढळराव यांना डॉ. कोल्हे यांची जात दिसली . कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रती इमानदार आहेत. पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज कळावे यासाठी स्वत:चे सर्वस्व पणाला लावून त्यांनी बाबाजी ढमढेरे यांचा इतिहास समाजासमोर आणला, असे मुंडे यांनी सांगितले.
यावेळी प्रदीप गारटकर, प्रदीप कंद,सुजाता पवार, माजी आमदार दिलीप ढमढेरे, पोपटराव गावडे, काकासाहेब पलांडे, निवृत्ती अण्णा गवारे, मंगलदास बांदल, बाळासाहेब ढमढेरे, बाळासाहेब नरके, कुसुम मांढरे. सरपंच सोनवणे, शंकर भूमकर, वर्षा शिवले, मानसिंग पाचुंदकर,शेखर पाचुंदकर, प्रकाश पवार, स्वाती पाचुंदकर ,सविता बगाटे, केशर पवार, महेश ढमढेरे, वैभव,विजय ढमढेरे,विश्वास ढमढेरे,वैभव यादव,अनिल भुजबळ,रवी काळे,जयमाला जकाते,मोनिका हारगुडे,विद्या भुजबळ,संगीता शेवाळे आदि उपस्थित होते .