आम्हाला ठाण्यात महापौरांच्या बंगल्यावर नेण्यात आले. तिथून आम्हाला साहेब पुढे आहेत, तिकडे आपल्याला जायचे आहे, असे सांगितले. स्टाफ आमच्यासोबत होता. आम्हाला दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले. पुढे निघालो, वसई-विरार मला ते भाग माहिती नाहीत, शहरे संपू लागली आणि माझ्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वेगळे घडतेय अशी शंका आली, अशा शब्दांत शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदेंनी गुजरातला नेण्याच्या घटनेचा थरार सांगितला.
तिथून पुढे एका हॉटेलवर थांबविण्यात आले. पुढे निघालो तेव्हा गुजरात बॉर्डरवर चेकपोस्ट लागले. ट्रॅफिक असल्याने आम्हाला शिंदे यांच्या स्टाफने चालत पुढे जाऊया असे सांगितले. गाडीतून बाहेर पडलो आणि मी तिथून निसटलो. अंधार होता, मुंबईच्या दिशेने चालू लागलो. बाईकवाल्याला मला मुंबईकडे जायचेय, तू जिथपर्यंत जातोयस तिथपर्यंत सोड,असे सांगितले. त्याने सोडले. पुढे एमपीचा ट्रक भेटला. चालकाला मी अडचणीत आहे, असे सांगितले. तो तयार झाला. त्याने दहिसरपर्यंत सोडले. तोवर साहेबांशी संपर्क साधला होता, त्यांनी मला नेण्यासाठी गाडी पाठविली होती, असेही कैलास पाटील म्हणाले.
मी मोटरसायकलवरून आल्याने भिजलो होतो, माझ्या मोबाईलची बॅटरीही सात टक्के राहिली होती. त्यामुळे मी कोणाला लोकेशन पाठविले नाही. उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला. साहेबांनी टोल नाक्यावर मला नेण्यासाठी गाडी पाठविली होती. तो माणूस तिथे आला. मी मुंबईत दाखल झालो, असे कैलास पाटील यांनी सांगितले.
ज्या शिवसेनेने मला आमदार केले त्या शिवसेनेशी प्रतारणा करायचे मला पटले नाही. शिवसेनेविरोधात कटकारस्थान आखले गेले आहे. काही आमदार तिथे अडकले आहेत, असे कैलास पाटील म्हणाले.