मुंबई - Vinod Tawade in Bihar Political Crisis ( Marathi News ) नुकतेच बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या जेडीयूसोबतची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. या राजकीय सत्तानाट्यात बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडे यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाविरोधात इंडिया आघाडीचा नारा देणाऱ्या नीतीश कुमारांना भाजपाच्या बाजूने पुन्हा कसं आणलं याबाबत विनोद तावडेंनी पडद्यामागील कहाणी सांगितली आहे.
विनोद तावडे म्हणाले की, नीतीश कुमार यांचे ४५ आमदार आले, आमचे ७८ आमदार आले तरीही भाजपाने नीतीश कुमारांना मुख्यमंत्रिपद दिले होते. पण त्यावेळी त्यांच्या मनात थोडी असुरक्षेची भावना होती. त्या काळात लालू प्रसाद यादव यांनी नीतीश कुमारांना स्वप्न दाखवले. विरोधकांची आघाडी होईल आणि या आघाडीचे निमंत्रक होऊन तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा बनू शकता त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत या. आता नीतीश कुमारांना ते पंतप्रधान म्हणून निवडून येऊ शकत नाही हे माहिती होते. पण तो चेहरा झाला तर त्या बळावर २०२४ ला निवडणूक होईल परंतु त्यानंतर २०२५ ची निवडणूक मला आरामात जिंकता येईल या विचाराने नीतीश कुमार यांनी आमची साथ सोडली आणि विरोधात गेले असं तावडेंनी सांगितले.
मात्र या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे, सव्वा महिन्यापूर्वी बंगळुरूच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंना इंडिया आघाडीचे निमंत्रक बनवले. त्याठिकाणी नीतीश कुमारांना जाणीव झाली या लोकांनी आपला वापर केला. त्यानंतर त्यांची मानसिकता बदलली. त्या परिस्थितीचा स्वाभाविकपणे आम्ही लाभ उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी संवाद सुरू झाला. परंतु त्यावेळीही ते पुढे जात नव्हते. मात्र जेव्हा लालू प्रसाद यादव यांनी नीतीश कुमारांचा पक्ष फोडायचा प्रयत्न केला, आमदार बाजूला घेऊन तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवायचं प्लॅनिंग सुरू होते असा दावा विनोद तावडे यांनी केला. ABP माझाच्या विशेष मुलाखतीत विनोद तावडेंनी सत्तानाट्यामागील घडामोडींचा खुलासा केला.
त्यात तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवणे हे आम्हालाही चालणार नव्हते. आम्ही राजकीय पक्ष आहोत. आम्हाला सत्तेत यायचे आहे तसे त्या राज्याचे हितही करायचे आहे. तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनले असते तर राज्यात गुंडाराज आला असता. तो आम्हाला येऊ द्यायचा नव्हता. तेव्हा आम्ही एकत्र येणार नाही असं म्हटलंय ना, असं राजकारणात करता येत नाही. राजकारणात सातत्याने बदलत्या स्थितीचा आढावा घेत तुमचा विचार कायम ठेवत पुढे जावे लागते ते आम्ही केले असं विनोद तावडे यांनी स्पष्ट सांगितले.