मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस हे आमचं कुटुंब आहे. शरद पवारांनी नवीन फळी राष्ट्रवादीत उभी केली. सुशीलकुमार शिंदे यांनासुद्धा राजकारणात आणि समाजकारणात संधी देण्याचं काम पवारांनी केले. शरद पवारांनी आबा-दादा-जयंतराव, दिलीपराव आणि आमच्यासारख्यांना संधी दिली. पण जेव्हा सुप्रिया सुळे यांचा राजकारणात प्रवेश करताना शरद पवारांच्या मनात संकोच होता. माझ्या मुलीला समोर करायची की नाही. आपल्याकडे काम करणारे अनेक आहेत असं वाटत होते असं राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी सांगितले.
अभिनंदन आणि अभिवादन या सुनील तटकरे यांच्या पुस्तकाचं लोकार्पण झालं आहे. त्यावेळी प्रफुल पटेल म्हणाले की, चांगली कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. सुनील तटकरे यांच्याबद्दल खूप लोकांकडून ऐकलं आहे. माझे २५ वर्षापासून अगदी जवळचे सहकारी संबंध आहे. त्यावेळी राज्यसभेची एक जागा रिकामी झाली होती. तेव्हा मी शरद पवारांना मी सांगितले तुम्ही या जागेसाठी सुप्रिया सुळेंना पुढे आणा. कसं करायचं नाही करायचं असं मनात होतं. माझ्याच घरच्या मुलीला मी कसं पुढे करू असं पवारांना वाटत होते. पण आम्ही सगळ्यांनी आग्रह केला तेव्हा सुप्रिया सुळेंना संधी देण्याचं शरद पवारांनी कबूल केले असं त्यांनी सांगितले.
त्यानंतर आता खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचा १६ वर्षाचा प्रवास झाला. राज्यसभेवर २ वेळा आणि तिसऱ्यांदा लोकसभेवर आल्या. एका व्यक्तीला संधी मिळते तेव्हा त्याचं सोनं करायची की नाही हे आपल्या हातात असते. त्याचप्रमाणे सुनील तटकरेंचा उल्लेख करतो. त्यांनी त्यांच्या पुस्तकात शरद पवारांचा उल्लेख करणे स्वाभाविक होते. पण त्याचसोबत इंदिरा गांधीचा, अतुंलेंचा आणि आर आर आबांचा विशेष उल्लेख केला आहे. काही लोकांचा प्रभाव माणसाच्या मनावर पडतो. प्रभावी लोक जीवनात आल्यानंतर त्यांची छाप जीवनावर पडते. ते माणसाच्या विचारात आणि कार्यात दिसून येते. सुनील तटकरेंनी त्यांच्या आयुष्याच्या काळात अनेकांसोबत काम केले. तटकरेंना भाषणापुरतं मर्यादित न ठेवता लोकांसाठी हा माणूस काय करू शकतो हे दाखवून दिले. छोटसं काम जरी आले आपल्या भागाचं, मतदारसंघाचा, कोकणाचा असो राज्याचा विचार करून काम करत होते. उत्कृष्ट नेतृत्व कोकणाला, महाराष्ट्राला आणि देशाला दिले आहे असं कौतुक प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.
दरम्यान, संसदेत राष्ट्रवादीचे ५ खासदार आहेत. संसदरत्न म्हणून सुप्रिया सुळेंना खिताब मिळाला हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अमोल कोल्हे, लक्षद्वीप खासदर मोहम्मद फैझल यांचे भाषण उत्तम होते. त्यांच्यासोबत श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरेंचेही भाषणही संसदेत ऐकायला मिळते. कोकणातील जागा ठाकरे गटाला मिळणार नाही. आम्ही तुम्हाला आजच सांगतो कार्यकर्त्यांनीही तयारीतच राहा असं सांगत प्रफुल पटेल यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला.